सातारा : महाराष्ट्राचे वाल्मीकी ग. दि. मांडगूळकर विरचित आणि भावगंधर्व सुधीर फडके यांनी स्वरसाज चढवलेला दै. ‘पुढारी’ च्यावतीने आयोजित ‘गीतरामायण’ हा बहारदार कार्यक्रम शनिवार दि.12 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक सभागृहात आयोजित केला आहे. चंदुकाका सराफ ज्वेल्स हे या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. गायक श्रीधर फडके गीत रामायण सादर करणार असून हा कार्यक्रम नि:शुल्क आहे. कार्यक्रमाच्या प्रवेशिका दै.पुढारी कार्यालय सातारा व चंदूकाका सराफ ज्वेलस् सातारा येथे उपलब्ध आहेत.
महाकाव्य असलेल्या रामचरित्रातील एकामागून एक अशा प्रसंगांवर उत्कृष्ट रचना गदिमांनी केल्या व त्याला तितक्याच सुमधुर चाली सुधीर फडके यांनी रचल्या. हेच सादरीकरण आता सातार्यात श्रीधर फडके करणार आहेत. गीतरामायण शब्दमाळेतील 56 गीते मनाच्या विविध भावावस्थांनी ओथंबलेली काव्यफुलेच आहेत. गीत रामायाणातून राम कथा उलगडत असून राम-रावणाचे युध्द, सीतेचे अग्नीदिव्य अन् पुढे सीतेला वनवासाला सोडण्याचे मन हेलावणारे प्रसंग आपल्या प्रतिभेने गदिमांनी जिवंत केले आहेत. तसेच रामभक्त हनुमान जयंतीलाच गीतरामायणाचे सादरीकरण होणार असल्याने दुग्धशर्करा योगच साधला जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर गीत रामायण ऐकण्यासाठी सातारकरांबरोबरच जिल्ह्यातील रसिकजन आतुर झाले आहेत. या पार्श्वभूमीवर नि:शुल्क प्रवेशिका वाटपास प्रारंभ झाला असून त्यास सातारकर रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. कार्यक्रमाच्या नि:शुल्क प्रवेशिका दै. ‘पुढारी’ कार्यालय, आनंदवाडी, दत्त मंदिराशेजारी, सातारा व चंदूकाका सराफ ज्वेल्स पोवई नाका सातारा येथे सकाळी 11 ते सायंकाळी 6 या वेळेत उपलब्ध आहेत. एक प्रवेशिका एका व्यक्तीसाठीच असून हा कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठीच आहे. अधिक माहितीसाठी 8805007180 या क्रमांकावर संपर्क साधावा. या कार्यक्रमाला साताराकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन दै. ‘पुढारी’व चंदुकाका सराफ यांच्यावतीने करण्यात आले आहे.