कराड : महाराष्ट्रासाठी वरदायिनी असलेल्या कोयना धरणाचा पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे सायंकाळी पाच वाजल्यापासून धरणाचे सहा वक्री दरवाजे 1 फूट 6 इंच उचलून प्रतिसेकंद 10 हजार क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग कोयना नदीत सुरू करण्यात आला होता.
मुसळधार पाऊस सुरू असल्याने कोयना धरण व्यवस्थापनाने सायंकाळी सात वाजल्यापासून हा विसर्ग वाढवत प्रतिसेकंद 20 हजार क्युसेक इतका करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील तीन दिवसांपासून पायथा वीजगृहातून 1 हजार 50 क्युसेक पाणी कोयना नदीत सोडले जात होते.
त्यामुळे सायंकाळी सात वाजल्यापासून कोयना नदीत प्रतिसेकंद 21 हजार 50 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू राहणार आहे. त्यामुळे कोयना व कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असून सातारा व सांगली जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच नदीच्या पात्रात कोणीही जाऊ नये, असा इशाराही देण्यात आलेला आहे.
कण्हेर धरणातून सायंकाळी 6 वा. आणखी पाण्याचा विसर्ग वाढवून 7000 क्यूसेक्स पाणी वेण्णा नदी पात्रात सोडण्यात आले आहे. सध्या धरणाचे चारी दरवाजे 0.80 मीटरने उचलले आहेत.