सातारा : चित्रपट दिग्दर्शक, निर्माते शकील नुरानी याला अभिनेत्रीवरील अत्याचारप्रकरणी रेंगडी (ता. जावली) येथून मेढा पोलिसांनी ताब्यात घेतले. मुंबईमध्ये त्याच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तो जिल्ह्यातील रेंगडी येथे फार्महाऊसमध्ये लपून बसला होता. मेढा पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले.
'जोरू का गुलाम' यासह अनेक बिग बजेट चित्रपटाचा शकील नुरानी हा दिग्दर्शक आहे. त्याच्यावर मुंबई येथील मालवणी पोलिस ठाण्यात अत्याचार व लैंगिक छळाचा गुन्हा दाखल झालेला आहे. ३३ वर्षीय अभिनेत्रीने याबाबतची तक्रार दिली आहे. आगामी चित्रपटाच्या चर्चेच्या बहाण्याने शकील नुरानी याने अभिनेत्रीला घरी बोलावून घेतले. तिला नशेचे पदार्थ देणे तसेच व्हिडीओद्वारे धमकावल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. दिग्दर्शकाविरुद्ध हा गुन्हा दाखल झाल्यानंतर बॉलीवूडमध्ये खळबळ उडाली.
मालवणी पोलिस त्याचा शोध घेत असताना तो सापडत नव्हता. मालवणी पोलिसांना नुरानीबाबत शनिवारी माहिती मिळाली. जिल्ह्यातील रेंगडी गावात असल्याचे समजताच मुंबई पोलिसांनी मेढा पोलिसांशी संपर्क साधला. सपोनि सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस धीरजकुमार बेचके, शिवाजी डफळे यांनी नुरानी याच्या फार्महाऊसवर सायंकाळी छापा टाकला. तेथे नुरानी पोलिसांना सापडला. मेढा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तोपर्यंत रात्री मुंबई पोलिसांचे पथक मेढा पोलिस ठाण्यात पोहोचले व त्याचा ताबा घेऊन ते मुंबईला गेले. मुंबईतच त्याच्या अटकेची कारवाई केली जाणार आहे.