मारूल हवेली : कराड-पाटण मार्गावरील दिशादर्शक फलक सध्या झाडी झुडपात झाकून गेले असून काही दिशादर्शक फलकाची नासधूस झाली आहे. त्यातच व्यवसायिकांच्या फलकांचे रस्त्यावरील अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे सुरक्षित वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने या फलकावरील झाडी-झुडपे हटविण्याची मागणी नागरिक व वाहन चालकांकडून केली जात आहे.
कराड ते पाटण आणि पुढे चिपळूणपर्यंत जाणारा हा महत्त्वाचा महामार्ग आहे. हा मार्ग सह्याद्री पर्वतरांगांमधून जाताना घाट रस्ता असल्याने येथे नेहमीच रस्ते वाहतूक व देखभालीच्या समस्या भेडसावत असतात. या मार्गाचे रुंदीकरण व काँक्रिटीकरणचे काम झाल्यापासून कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उभे केले जातात. अद्याप म्हावशी फाट्या पासून कोयनेच्या दिशेला मार्गाच्या दर्जा उन्नतीच्या कामाचा बोजवारा उडाला आहे.
दरम्यान काही ठिकाणी मार्गावरील दिशादर्शक फलक झुडपात गेल्याचे चित्र दिसून येत आहे. दिशादर्शक फलक झुडपे, झाडे किंवा वाढत्या वनस्पतीमुळे झाकले गेले आहेत. याशिवाय काही ठिकाणी दिशादर्शक फलकांचा सर्रास वापर खाजगी फ्लेक्स बोर्ड लावण्यासाठी केला जात आहे. यामुळे वाहतुकीला अडथळा येऊन अपघातांचा धोका वाढतो आहे. मार्गाच्या बाजूला असणाऱ्या दिशादर्शक फलकाकडे दुर्लक्ष केले जात आहे. सध्या पावसाळ्यामुळे झाडी-झुडपे वाढल्याने त्या दिशादर्शक फलकावर पसरल्या आहेत. त्यामुळे पर्यटक व वाहनचालकांना धोकादायक ठिकाण, स्पीड ब्रेकर, वाहनांचा वेग, मार्ग दाखविणारे फलक दिसत नाहीत.
तसेच साईडपट्ट्यावर अतिक्रमण झाल्याने नवीन चालक व पर्यटक यांना वाहने हाकताना अडचण निर्माण होत आहे. रात्रीच्या वेळी प्रवास करताना दिशादर्शक फलक दिसत नसल्याने वाहन चालकांची फसगत होत आहे. दिशादर्शक फलकावर वाढलेली झाडी हटविण्यात यावी व दिशादर्शक फलकाची झालेल्या नुकसानीची योग्य ती कार्यवाही करावी, तसेच मार्गावर दोन्ही बाजूने होत असलेल्या अतिक्रमणाला आळा घालावा, अशी मागणी वाहन चालक व नागरिकांतून होत आहे.