वाई : सातारा, माण, खटाव, कोरेगाव आणि वाई या पाच तालुक्यांची तहान भागवणाऱ्या धोम व बलकवडी धरण प्रकल्पांत पाणीसाठ्यात वेगाने घट होवू लागली आहे. 11.69 टीएमसी असणाऱ्या या धरणात सध्याच्या घडीला केवळ 4.50 टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. एकूण साठ्याच्या हे प्रमाण 38.48 टक्के आहे. या धरणावर पाच तालुक्यांना पाणी जात असल्याने पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे.
एप्रिलच्या मध्यावरच जिल्ह्याचा पारा 41 अंशावर जावून पोहचला आहे. यामुळे सर्वच पाणीसाठे झपाट्याने कमी होवू लागले आहेत. वाई तालुक्याच्या पश्चिम भागात असणाऱ्या धोम-बलकवडी धरणातील पाणीसाठाही घटू लागला आहे. धोम धरणाची क्षमता ही 11.69 टीएमसी आहे. यातील सुमारे 7.80 टीएमसी पाण्याचा वापर शेतीसाठी झाला आहे. दिवसेंदिवस उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होवून साठ्यात घट होत आहे. बलकवडी प्रकल्पाचा एकूण पाणीसाठा गतवर्षी 0.97 टीएमसी होता, तो यंदा 1.48 टीएमसी आहे.
गतवर्षी याच दिवशी धरणातील पाणीसाठा 4.02 टीएमसी होता. यंदा 4.50 टीएमसी आहे. गतवर्षीपेक्षा अर्धा टीएमसी पाणी जास्त असले तरी हवामान विभागाने राज्यात सरासरी 90 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यातही सप्टेंबरपर्यत पाऊस कमी असणार आहे. यामुळेच राज्य सरकारने ऑगस्ट पर्यंत धरणातील पाणी आरक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शेतीसाठी सोडण्यात जाणाऱ्या पाण्याचीही अडचण होणार आहे.
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांनी नुकत्याच झालेल्या टंचाई आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना पिण्याचे व शेतीसाठीचे पाणी कमी पडू न देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार प्रशासनाने योग्य नियोजन करत धोम धरणाचा उजवा कालवा 2 एप्रिलपासून, तर डावा कालवा 6 एप्रिलपासून सुरू केला आहे. सिंचनासाठी नियोजनबद्ध पद्धतीने पाण्याचा वापर सुरू असून, पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पाटबंधारे विभागाने आवश्यक ती खबरदारी घेतली आहे.
टंचाई आढावा बैठकीच्या अनुषंगाने सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित साठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे उन्हाळ्यात शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याला फारशी अडचण येईल, असे चित्र सध्या दिसत नाही. कार्यकारी संचालक व जिल्हास्तरीय समितीच्या आदेशानुसार गरजेनुसार पाणी सोडण्यात येणार आहे.योगेश शिंदे, कार्यकारी अभियंता