Dhairyashil Kadam  
सातारा

Dhairyashil Kadam | माझ्या नव्या राजकीय पर्वाची सुरुवात : आ. धैर्यशील कदम

धैर्यशील कदम यांनी ३०१ मतांच्या मताधिक्याने विजय संपादन केला

पुढारी वृत्तसेवा

कराड : सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत भाजप-महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी ३०१ मतांच्या मताधिक्याने विजय संपादन केला आहे. विजयानंतर आमदार धैर्यशील कदम यांनी कराड येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास, तसेच यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केले. त्यानंतर भाजप कराड शहर, उत्तर व दक्षिण मतदारसंघांच्या वतीने त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

दरम्यान, आता मी विधानपरिषदेत निवडून आलो आहे. मंत्री जयकुमार गोरे आणि इतर नेत्यांनी दिलेला शब्द पूर्ण झाला आहे. या भूमीतील नव्या राजकीय पर्वाची माझी सुरुवात आहे, अशी भावना आ. धैर्यशील कदम यांनी व्यक्त केली. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार मनोज घोरपडे, माजी आमदार आनंदराव पाटील, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार धैर्यशील कदम म्हणाले, गेली तीन दशके सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करत आहे. भाजपने जिल्हाध्यक्षपदासह विविध जबाबदाऱ्या दिल्या. आज विधानपरिषद आमदार म्हणून निवडून येण्याची संधी मिळाली. भाजप आणि महायुतीतील सर्व नेत्यांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास मी सार्थ ठरविणार.

उमेदवारीपासून विजयापर्यंत सर्वच नेत्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. कोणी काय दिले, यापेक्षा भाजप-महायुती सरकारने मला आमदार होण्याची संधी दिली, याचे समाधान अधिक आहे. महायुतीतील सर्व नेत्यांनी एकजुटीने मतदान केले असून, आमची मते फुटली नसून, माझा कोणावरही आक्षेप नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

२००७ पासून कराड उत्तर मतदारसंघात मी सातत्याने काम करत आहे. २००९ मध्ये डॉ. अतुल भोसले यांच्यामुळे मला थांबावे लागले. २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अत्यंत कमी फरकाने पराभव स्वीकारावा लागला. त्या काळात कराड उत्तरमध्ये मनोज घोरपडे आणि माझ्यात राजकीय संघर्ष होता. मात्र नेते जयकुमार गोरे यांनी मध्यस्थी करत आम्ही दोघेही भविष्यात आमदार होऊ, असा शब्द दिला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT