फलटण; पुढारी वृत्तसेवा : फलटण तालुक्यातील विविध विकासकामांच्या भूमिपूजनासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील बुधवार दि. 17 जानेवारी रोजी फलटण तालुक्याच्या दौर्यावर येत आहेत. फलटण येथे दुपारी 3 वाजता होणार्या कार्यक्रमास तालुक्यातील जनतेने लाखोच्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले.
कोळकी (ता. फलटण) येथील विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना खा. निंबाळकर म्हणाले, बुधवार दि. 17 जानेवारी रोजी दु. 2 वा. नीरा देवधरच्या कॅनाल कामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व आमदार व खासदारांना निमंत्रित करण्यात आले आहे. फलटण -बारामतीचा रेल्वे मार्गामुळे आता दक्षिणेच्या गाड्या फलटण मार्गे जात आहेत. नीरा देवधरसाठी कै. हिंदूराव नाईक-निंबाळकर यांनी केलेल्या संघर्षामुळे या योजनेचे पाणी फलटण, माळशिरस, सांगोला, पंढरपूर या दुष्काळी भागात जाणार आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फलटण तालुक्यामधील महत्त्वाच्या प्रकल्पांचे भूमिपूजन आयोजित करण्यात आले आहे. त्यामध्ये काळज येथे नीरा देवधर प्रकल्प, नाईकबोंबवाडी येथील एमआयडीसी प्रकल्प या सोबतच विविध योजनांचे लोकार्पण हे ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या माध्यमातून तालुक्यात आठवं आश्चर्य प्रत्यक्षात येत असून या तालुक्याची स्वप्नपूर्ती व माझी वचनपूर्ती होत आहे. या कार्यक्रमाला तालुक्यातील जनतेने लाखोच्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही त्यांनी केले.