Devendra Fadnavis
महाबळेश्वर : पर्यटनात महाराष्ट्र देशात पाचव्या क्रमांकावर आहे. राज्यात किल्ले, समुद्र किनारा, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, ऐतिहासिक ठिकाणे यासह विविध पर्यटनस्थळे आहेत. आपण जर प्रयत्न केला तर देशात महाराष्ट्राला पर्यटनात पहिल्या क्रमांकावर येण्याची व विदेशी पर्यटक आणण्याची संधी आहे.
यापुढे एक एक पाऊल टाकून पाच वर्षांत महाराष्ट्राला पर्यटनात ‘नंबर वन’ला आणू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दरम्यान, महाबळेश्वर हे देशातील उत्तम पर्यटनस्थळ आहे. मात्र, देशभरात त्याच्या मार्केटिंगची गरज असल्याचेही ना. फडणवीस म्हणाले. महाबळेश्वर येथे आयोजित महापर्यटन महोत्सवाचा रंगारंग समारोप सोहळा पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, ना. शंभुराज देसाई, ना. मकरंद पाटील, ना. शिवेंद्रराजे भोसले, ना. जयकुमार गोरे, ना. उदय सामंत, आ. अतुल भोसले, आ. सचिन पाटील, पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी, जिल्हाधिकारी संतोष पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर, पर्यटन विभागाचे संचालक डॉ. बी. एन. पाटील, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार तेजस्विनी पाटील उपस्थित होते.
ना. देवेंद्र फडणवीस म्हणाले, वेस्टर्न घाटात निसर्गसौंदर्याने मुक्तहस्ते उधळण केली आहे. हे अजून अनएक्सप्लोर आहे. स्थानिकांसह पर्यटकांना याची अनुभूती देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक झाल्यास मोठया प्रमाणात रोजगार निर्माण होतात. जगात सर्वाधिक रोजगार उपलब्ध करून देणारा पर्यटन उद्योग आहे. यासाठी जेवढे जास्त पाठबळ देवू तेवढीच रोजगार निर्मिती करू शकू. त्याचाच एक नमुना म्हणून हा महापर्यटन उत्सव पहायला मिळत आहे.
महाबळेश्वरमध्ये जागतिक वारसास्थळे व भरपूर पर्यटनस्थळे आहेत. तरीही महाराष्ट्र पर्यटनात देशात पाचव्या क्रमांकाला आहे. प्रत्येक पर्यटनस्थळाचा लोकल फिल, पर्यटनाची संस्कृती व पर्यटनाच्या बेसिक सुविधा दिल्यास महाराष्ट्राला पर्यटनात नंबर वन होवू शकतो. या महोत्सवातून याचा प्रारंभ झाला असून पुढील पाच वर्षात एक-एक पाऊल टाकत महाराष्ट्राला देशात नंबर वनला आणू. महाबळेश्वर हे देशातील सर्वोत्तम पर्यटनस्थळ आहे. मात्र, देशात महाबळेश्वरचे मार्केटिंग पुरेसे झाले नाही. त्यामुळे ताकतीने महाबळेश्वरचे देशात मार्केट करण्याची आवश्यकता आहे. जेवढे मार्केटींग करायला पाहिजे तेवढे झाले नाही. नवीन महाबळेश्वर ही संकल्पना आणली आहे. तेथे गिरीस्थान तयार करणार आहे. त्यातून नवीन संधी प्राप्त होतील. सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर केल्यास पर्यटनवाढीस वाव मिळणार आहे.
पर्यटन वाढीसाठी पर्यटन विभागाने वर्षभराचे महोत्सवाचे कॅलेंडर तयार केले पाहिजे. टूर ऑपरेटरसोबत वार्षिक कॉन्फरन्स करून त्यानुसार त्यांचे नियोजन करण्यासाठी पाठपुरावा करणे. तसेच ऑनलाईन बुकींग वाढल्याने एका पोर्टलवर सर्व गोष्टी उपलब्ध करून दिल्यास पर्यटनाची गाडी सुसाट धावेल. ही केवळ सुरूवात असून यापुढे अनेक महोत्सव तयार होईल. तुम्ही जे कॅलेंडर तयार कराल त्याच्या पाठिशी आम्ही उभे राहू, अशी ग्वाहीही ना. फडणवीस यांनी दिली.
ना. एकनाथ शिंदे म्हणाले, हा पर्यटन महोत्सव रोजगाराचे महाद्वार असून स्थानिकांना याचा फायदा मिळणार आहे. या महोत्सवातून लोकसंस्कृतीचा गजर पहायला मिळाला. एका महोत्सवातून सर्व गोष्टी पहायला मिळाल्या. हा महोत्सव डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. या फेस्टिव्हलमुळे येथील निसर्ग सौंदर्य झळाळून निघाले आहे. यातूनच नवीन महाबळेश्वर आकार घेईल. त्याचा पाया रचत आहोत. नवीन पर्यटनस्थळ निर्माण केले जाईल. हा महोत्सव याची सुरूवात आहे. आम्ही टीम म्हणून काम केले आहे. लाडक्या बहिणी व भावांसाठी काम केले. लोकाभिमुख योजनांना प्राधान्य दिले. पर्यटन, गडकोट संवर्धनही सरकार करत आहेत. आपला वारसा जपण्याचे काम केले जात आहे. देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली विकासाचा रथ चौखुर उधळत आहे, असेही ते म्हणाले.
ना. शंभूराज देसाई प्रास्तविक करताना म्हणाले, हा महोत्सव यशस्वी झाल्यानंतर राज्याच्या पाच महसूली विभागात प्रत्येक एक पर्यटनमहोत्सव भरवणार आहे. राज्यात पर्यटनाला भरपूर वाव आहे. मुनावळेत अॅडव्हान्स जेट स्की आणून पर्यटकांना सुविधा दिल्या आहेत. कोयनेचे बॅकवॉटरमध्ये वॉटर स्पोर्टस् अॅक्टिव्हिटी करण्यास परवानगी दिली आहे. मुनावळेत याला सुरूवात केल्यानंतर चांगला प्रतिसाद मिळाला आहे. बॅक वॉटर फेस्टिव्हल राबवल्यास त्याचाही पर्यटकांना अनुभव घेता येईल. या महोत्सवाला पाऊण लाख लोकांनी भेट दिली. या माध्यमातून टूरिस्ट ब्रँडींग करण्याचा प्रयत्न केल्याचे ना. देसाई यांनी सांगितले. यावेळी प्रा. राम शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.
मी गावी येतो तेव्हा इकडे तापमान खाली असते तर तिकडे मुंबईचे तापमान वाढते. यानंतर विरोधक हेडलाईन करतात त्याचा मी आनंद घेतो, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या भाषणात म्हणाले. त्यावर ना. देवेंद्र फडणवीस यांनीही याचीच री ओढून एकनाथ शिंदे इथे आले की बातम्या वेगळ्याच होतात. तसे निसर्गसौंदर्यच इथे आहे. ते इथे आले की नव संजीवनी घेतात व मुंबईत येतात. ती नवसंजीवनी घेण्यासाठी आम्हालाही बोलवा. त्यासाठी आपण तुमच्या दरे गावात एक दोन कॅबिनेटच्या बैठकाही बोलवू, असे सांगितले.