कुडाळ : विकास कामांना उशीर झाला तर तुम्ही जसे नाराज होता तशी नाराजी माझ्या मनातही निर्माण होऊ शकते. म्हणूनच या निवडणुकीत कुडाळ गटातील भाजपच्या उमेदवार सौ. जयश्री गिरी यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहा. विकासाची जबाबदारी माझी आहे आणि जयश्री गिरींना साथ देण्याची जबाबदारी तुमची आहे, असे आवाहन ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी केले.
कुडाळ येथील जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी माजी सभापती सुहास गिरी, कुडाळ गटातील उमेदवार सौ. जयश्री गिरी, कुडाळ गणातील उमेदवार सौरभ शिंदे, सायगाव गणातील उमेदवार चारुशीला पवार, शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष मच्छिंद्र मुळीक यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ना. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, कुडाळ गटाला सौ. जयश्री गिरी यांच्या रूपाने सात्विक आणि संवेदनशील नेतृत्व मिळत आहे. गेल्या काही वर्षांत त्यांची काम करण्याची तळमळ मी जवळून पाहिली आहे. सभापती असताना विकास कामांसाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू असायचा.‘काम झालंच पाहिजे’ ही त्यांची जिद्द आपण सगळ्यांनी अनुभवली आहे. त्यामुळे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहा. मी त्यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. लोकसेवेत त्या कधीच कमी पडणार नाहीत. यावेळी त्यांनी सौरभ शिंदे आणि चारुशीला पवार यांनाही साथ देण्याचे आवाहन केले.
माजी सभापती सुहास गिरी म्हणाले, आज मनात एकच भावना आहे, कृतज्ञतेची आणि जबाबदारीची. कृतज्ञता शिवेंद्रबाबांची आणि जबाबदारी या कुडाळ गटातील प्रत्येक घराची. आज माझी पत्नी सौ. जयश्री गिरी तुमच्या पाठबळावर आणि शिवेंद्रबाबांच्या विश्वासावर उभी आहे. बाबाराजेंनी आमच्यावर टाकलेला विश्वास म्हणजे आमच्या आयुष्याची शिदोरी आहे. एक वेळ राजकारण सोडेन, पण त्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही.
सौ. जयश्री गिरी म्हणाल्या, शिवेंद्रबाबांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, तो मला प्राणपणाने सार्थकी लावायचा आहे. मला कुठल्याही पदाची हाव नाही. उद्या मी पदावर असेन किंवा नसेन; पण तुमच्या सुख-दु:खात उभी असलेली जयश्री गिरी ही व्यक्ती कायम तुमच्यासोबत असेल. मतदान म्हणजे फक्त बटन दाबणं नाही, तर विश्वासावर उमटवलेली मोहोर आहे. तुमचा हा विश्वास मी जीवापाड जपेन.