सातारा : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान ही एक चळवळ असून हे अभियान गावोगावी राबवून विकास साधावा, असे आवाहन राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
सुरवडी, ता. फलटण येथे अभियानांतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते. मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, अभियानाची अंमलबजावणी करताना गावपातळीवर जिल्हा परिषदेकडे कार्यरत क्षेत्रीय कर्मचारी, अधिकाऱ्यांनी गावातील सर्व घटकांना एकत्रीत करुन दर आठवड्याला किमान एक वेळ श्रमदान करुन घ्यावे. तालुक्यातील सर्व गावांमध्ये अभियानाची चळवळ नेहमीच सुरु राहील याबाबत सर्व यंत्रणांनी ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, शिक्षक, पशुधन पर्यवेक्षकांनी जबाबदारी घ्यावी. त्याचबरोबर गावामध्ये कार्यरत हजर कर्मचाऱ्यांनी अभियानाच्या मुख्य प्रवाहामध्ये सामील होवून अभियान यशस्वीपणे राबवण्याबाबत सहकार्य करावे, असे आवाहन ना. गोरे यांनी केले.
यावेळी आ. सचिन पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, शिवरुपराजे खर्डेकर, प्रल्हादराव साळुंखे पाटील, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, कार्यकारी अभियंता मोहसीन मोदी, सुधीर इंगळे, उपअभियंता, तालुका वैद्यकीय अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामपंचायत अधिकारी, शिक्षक, आरोग्य कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते. गटविकास अधिकारी सतीश कुंभार यांनी प्रास्ताविक केले.