बामणोली : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मूळ गाव असलेल्या दरे तर्फ तांब (ता. महाबळेश्वर) या ठिकाणी स्ट्रॉबेरी लागवड केली. यावेळी बोलताना त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे, असे आवाहन केले.
ना. एकनाथ शिंदे गावी आल्यानंतर आवर्जून शेतीत रमतात. यावेळी त्यांनी स्ट्रॉबेरी लागवड करुन शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीचा मंत्र दिला. यावेळी माध्यमांशी बोलताना ना. एकनाथ शिंदे म्हणाले, शासनाच्या माध्यमातून आम्ही टार्गेट ठेवले असून 25 लाख हेक्टर सेंद्रिय शेती झाली पाहिजे, असा निर्णय घेतला आहे. त्यावर मोठ्या प्रमाणावर यश मिळेल असा विश्वास आहे. शेतकऱ्याला देखील मोठ्या प्रमाणावर पैसे मिळतील. बांबूची देखील आपण मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. जिल्हाधिकारी यांच्याकडून माहिती घेतली असता नऊ हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी बांबू लागवड करण्यासाठी प्रस्ताव दिल्याचे सांगण्यात आले. बांबूला आम्ही शासनाच्या वतीने उद्योगाचा दर्जा दिला असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
मी स्वतः अगोदर या ठिकाणी माझ्या गावात, माझ्या शेतीत नैसर्गिक शेतीचा प्रयोग करत आहे. माझा मुलगा खा. डॉ. श्रीकांत शिंदे गावाकडे आल्यावर शेतीत रमतो. माझ्यापेक्षा जास्त मेहनत या शेतीत त्याची आहे. तो या शेतीत अधिक लक्ष देतो. या भागामध्ये फळे आणि इतर शेतीतील काही उत्पादने आहेत ती शहरात नेऊन विकणे शेतकऱ्यांना परवड नाही. त्यामुळे याच ठिकाणी त्यावर प्रक्रिया करून बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यावर शेतकऱ्याला त्याचा अधिक फायदा मिळेल, यासाठी देखील मी स्वतः प्रयत्न करत असून लवकरच तो देखील विषय मार्गी लावला जाईल.