सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील निधी व्हीपीडीए प्रणालीमुळे माघारी गेला आहे. त्यामुळे सर्व विभागांनी निधी वेळेत खर्च करावा अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी दिल्या. जिल्हा परिषदेच्या ठराव समितीची सभा मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीच्या सभागृहात झाली.
बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, प्रकल्प संचालक विश्वास सिद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, राहुल देसाई, प्रज्ञा माने, नागेश ठोंबरे, कार्यकारी अभियंता मोहसीन मोदी, अमर नलावडे, गौरव चक्के, अरुणकुमार दिलपाक, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, कृषि विकास अधिकारी गजानन ननावरे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी विद्यानंद चल्लावार, शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी, धनंजय चोपडे, शबनम मुजावर उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या सर्व विभागासह पंचायत समित्यांनी यशवंत पंचायत राज अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी. अभियानाच्या अनुषंगाने विभागस्तरीय पथकामार्फत मुल्याकंन होणार आहे. त्यादृष्टीने कार्यालयाचे रेकॉर्ड व्यवस्थित ठेवण्यात यावे. विविध विभागांनी विविध योजनांना प्रशासकीय मान्यता देण्याची कार्यवाही करावी. कोणत्याही योजनेचा निधी माघारी जाता कामा नये यासाठी जास्तीत जास्त निधी वेळेत कसा खर्च होईल यासाठी अधिकारी व कर्मचार्यांनी नियोजन करावे, अशा सूचनाही याशनी नागराजन यांनी अधिकार्यांना दिल्या.
सभेत किन्हई ता. कोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची जुनी मुख्य इमारत व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या खोल्या निर्लेखन करण्यास मंजुरी देण्यात आली. जलजीवन मिशनअंतर्गत पाणी गुणवत्ता अंतर्गत सोमर्डी ता. जावली येथे उपविभागीय प्रयोगशाळेची नवीन इमारत बांधण्यास मंजुरी देण्यात आली. जिल्हा वार्षिक योजनेमधून जि. प. शाळांना विज्ञान प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा, डिजिटल शाळा, इंटरनेट, वायफाय सुविधा निर्माण करण्यास मंजुरी देण्यात आली. जि. प. सेस निधीमधून मागासवर्गीय वस्तीत समाजमंदिराचे ग्रंथालय व अभ्यासिकेत रूपांतर करण्यासाठी 1 कोटी 56 लाख 99 हजार रुपयांना प्रशासकीय व तांत्रिक मान्यता देण्यात आली. सभेत विषयपत्रिकेसह ऐनवेळच्या विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली.