कोरेगाव : कोरेगाव येथील पत्रकार नवनाथ पवार यांना तलाठी पदावर कार्यरत असणार्या प्रशांत पवार यांनी तू मटक्याची बातमी का लावली?, अशी विचारणा करत मारहाण केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी तो जुजबी आहे. पत्रकार संरक्षण कायद्याखाली हा गुन्हा दाखल करावा आणि प्रशांत पवार यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी कोरेगाव तालुक्यातील पत्रकारांनी केली आहे.
नवनाथ पवार यांनी घडल्या प्रकाराबाबत शुक्रवारी रात्री दिलेल्या फिर्यादीवरून कोरेगाव पोलिस ठाण्यात तलाठी प्रशांत पवार यांच्या विरोधात रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर प्रशांत पवार यांचा मित्र निवास मेरुकर यांनीदेखील शुक्रवारी रात्री मोबाईलवरून नवनाथ पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे शनिवारी नव्याने अदखलपत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरेगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हणमंतराव बर्गे यांच्या नेतृत्वाखाली डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे समन्वयक गणेश बोतालजी, साप्ताहिक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजय कदम, कोरेगाव तालुक्यातील पत्रकार पांडुरंग बर्गे, सोमनाथ शिंदे, प्रकाश कुंभार, संदीप पवार, साहिल शहा, राजेंद्र तरडेकर, अजमुद्दिन मुल्ला, दादा वाकडे, देवानंद जमादार, अधिक बर्गे, संभाजी भोसले, सुनील पाटे यांनी जुन्या तहसीलदार कार्यालयाच्या आवारात निषेध केला. त्यानंतर पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांची भेट घेऊन याप्रकरणी तात्काळ कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले.
पत्रकार नवनाथ पवार यांनी घडल्या प्रकाराबाबत सविस्तर माहिती पोलिस निरीक्षक घनश्याम बल्लाळ व उपस्थित पत्रकारांना दिली. पोलिस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी आपण आवश्यक कागदपत्रे सादर करावीत, सरकारी वकिलांकडून अभिप्राय घेऊन याबाबत गुन्हा दाखल केला जाईल अशी ग्वाही दिली. याप्रकरणी लवकरच जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलिस अधीक्षक तुषार दोशी आणि कोरेगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी अजित टिके यांची भेट घेणार असल्याचे पदाधिकार्यांनी सांगितले.