सातारा : ब्लिंक इट या सेवा पुरवठादार कंपनीमध्ये डिलिव्हरीचे काम करणार्या युवकाने बंद फ्लॅटमध्ये घरफोडी केल्याचे सातारा शहर पोलिसांच्या तपासात समोर आले. संशयित युवकाला अटक केल्यानंतर त्याने घरफोडीची कबुली देत १३ लाख रुपयांचा मुद्देमाल दिला.
ओंकार नरेश बाबर (वय ३०, रा. सध्या रा. दिव्यनगरी, शाहूपुरी, सातारा मूळ रा. उडतारे, ता. वाई) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १५ जून रोजी शाहूनगर येथे भरदिवसा एका बंद घराचे कुलूप तोडून एका अज्ञात चोरट्याने घरामध्ये चोरी केली. चोरट्याने सोन्याचे दागिने चोरी केले होते. या घटनेचा गुन्हा सातारा शहर पोलिस ठाण्यात दाखल झाला. सातारा शहरचे गुन्हे प्रकटीकरणचे (डीबी) पोलिस तपास करत असताना त्यांना तांत्रिक माहितीच्या आधारे एका संशयित आरोपीची माहिती मिळाली. मात्र, संशयित कुठे राहतो? याची नेमकी माहिती मिळत नव्हती. पोलिस त्यासाठी दोन दिवसांपासून त्याच्या मागावार होते.
सातारा शहर पोलिसांना संशयिताची माहिती मिळाल्यानंतर त्याला ताब्यात घेतले. संशयिताकडे प्राथमिक चौकशी केल्यानंतर त्याने घरफोडीची कबुली दिली. त्यानुसार त्याला न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडी मिळाली. यावेळी चोरट्याकडून पोलिसांनी चोरीस गेलेला सोन्याचा मुद्देमाल, गुन्हा करतेवेळी वापरलेले वाहन, मोबाईल फोन असा एकूण १३,०१,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
पोनि सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सुधीर मोरे, पोलिस नीलेश यादव, नीलेश जाधव, विक्रम माने, प्रवीण कडव, पंकज मोहिते, तुषार भोसले, सागर गायकवाड, सुहास कदम सचिन रिटे, संतोष घाडगे, मच्छिंद्रनाथ माने, सुशांत कदम यांनी कारवाईत सहभाग घेतला.