तहसीलदारांना निवेदन देताना विलासबाबा जवळ व आम्ही जावलीकर चळवळीचे पदाधिकारी. Pudhari Photo
सातारा

Satara News | जावलीत ओला दुष्काळ जाहीर करा

आम्ही जावलीकर चळवळीची मागणी : शेतकर्‍यांना तातडीने भरपाई द्या

पुढारी वृत्तसेवा

मेढा : मे महिन्यापासून सुरू असलेल्या सततच्या पावसाने यावर्षी जावली तालुक्यात खरिपाचा पूर्ण हंगामच वाया जाण्याची भीती आहे. कडधान्य, सोयाबीन विकून शेतकरी वर्ग दिवाळीचा सण साजरा करत असतो पण यावर्षीचे चित्र धूसर आहे.

संततधार पावसाने पेरण्याच झालेल्या नाहीत. त्यामुळे सरकारने आता जावलीतील शेतकर्‍यांना मदत करावी अन्यथा शेतकर्‍यांना दिवाळीऐवजी शिमगा करण्याची वेळ येणार आहे. सरकारने गांभीर्यपूर्वक विचार करून प्रशासनाने तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी ‘आम्ही जावलीकर’ चळवळीच्या वतीने करण्यात आली आहे.

जावली तालुक्यात यंदा पावसाचे आगमन वेळेआधी मे महिन्याच्या मध्यंतरीच झाले. पावसामुळे जावली तालुक्यातील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले असून, अद्यापही 80 टक्के पेरण्या होऊ शकलेल्या नाहीत. सलग पडणार्‍या पावसामुळे शेतीची मशागतही यावर्षी शेतकरी वर्गाला करता आलेली नाही. मशागतच झाली नसल्याने व सततच्या पावसाने थोडीही उसंत न घेतल्याने अद्यापही पेरण्या करता आलेल्या नाहीत. विशेषतः मोरावळे ते बोंडारवाडी, धनकवडी ते भामघर आणि कोयना व करहर विभागातील अनेक गावात यावर्षी कडधान्ये, भुईमूग, सोयाबीन आणि भात पिकांच्या पेरण्या झालेल्या नाहीत.

शेतकर्‍यांनी भाताचे तरवे टाकले पण 20 टक्के रोपे अल्प प्रमाणात उगवली आहेत तर 80 टक्के भाताचे बी कुजून गेल्याने भात लावणी वाचून शेती पडून रहाणार आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. अनेक शेतकर्‍यांनी बियाणे खरेदी व खते यांची खरेदी उसनवारी व उधारीवर केली पण पावसाने ती वाया गेली. त्यामुळे शेतकर्‍यांसमोर अस्मानी संकट उभे राहिले आहे. आम्ही जावलीकर चळवळीचे विलासबाबा जवळ, राजेंद्र जाधव, शांताराम कदम, सुरेश पार्टे, भास्कर धनावडे, मारूती चिकणे, सचिन करंजेकर, अरूण जवळ, प्रकाश सुतार, सुरेश कदम, आनंदा परिहार, शरद देशमुख यांच्या निवेदनावर सह्या आहेत. या निवेदनाच्या प्रती ना. शिवेंद्रराजे भोसले, जिल्हाधिकारी यांनाही देण्यात आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT