कराड : महाराष्ट्रात काही महिन्यांपासून प्रचंड पाऊस पडतोय. राज्याच्या बुलढाणा, यवतमाळ, नंदुरबार, जालना या सर्व परिसरात दौरा केला. सर्वत्र बिकट परिस्थिती आहे. सरकारने सर्व निकष, नियम बाजूला ठेवून ताबडतोब ओला दुष्काळ जाहीर करावा आणि संपूर्ण कर्जमाफी करावी, अशी मागणी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली. या मागणीसाठी पुढील काळात प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करणार आहे.
मुंबई येथे मराठा आंदोलकांनादरम्यान आंदोलकांना मदत केल्याबद्दल सकल मराठा समाजाकडून कराड येथील शासकीय विश्रामगृहात शशिकांत शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, त्यांनी शिवतीर्थ दत्त चौकातील छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर विश्रामगृहात माध्यमांशी त्यांनी संवाद साधला.
शशिकांत शिंदे म्हणाले, महाराष्ट्राची ओळख सुसंस्कृत राजकारण म्हणून आहे. मात्र महाराष्ट्रामध्ये हल्ली काही लोक चुकीचे वक्तव्य करत आहेत. सरकारमध्ये असणारे लोक सरकारच्या यंत्रणेचा आधार घेऊन जर काही करत असतील, थोर व्यक्तिमत्त्वाचा अपमान करण्याचे सातत्याने धाडस करत असतील, तर ते खपवून घेणार नाही.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत प्रदेशाध्यक्ष म्हणून आपली रणनीती काय आहे? या प्रश्नावर ते म्हणाले, महाविकास आघाडी म्हणून बाळासाहेब थोरात व अन्य नेत्यांशी चर्चा केली आहे. आताच जागा वाटपाबाबत चर्चा करूया, नंतर आपण चर्चा करायला लागतो, तोपर्यंत उशीर होतो. प्रत्येक जिल्ह्याच्या नेत्यांना प्रत्येक जिल्हाध्यक्ष, विभागप्रमुख यांच्याशी चर्चा करून जागावाटपाबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा, अशा सूचना केलेल्या आहेत. सध्या लोकांमध्ये फार असंतोषाचे वातावरण आहे. फक्त त्याला क्रांतीचे स्वरूप दिले तर, निकाल वेगळे लागतील.
कर्जमाफी संदर्भात ते म्हणाले, सरकार काय कर्जमाफी करणार? या सरकारवरच साडेदहा हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. मे महिन्यापासून खरीप व रब्बी पिके वाया गेली. शेतकरी प्रचंड अडचणीत आले आहेत. 1300 पेक्षा जास्त शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे सरकारने संपूर्ण कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला नाही, तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
आंदोलनादरम्यान मराठा बांधवांना केलेल्या मदतीबाबत विचारले असता ते म्हणाले, मुंबई, नवी मुंबई येथे आंदोलनासाठी आलेल्या मराठा बांधवांना मदत करण्याची भूमिका मी घेतली, कर्तव्य म्हणून मदत केली. मागच्या वेळेला सुद्धा आंदोलन झालं, त्यावेळीही नवी मुंबईमध्ये आलेल्यांची सगळी व्यवस्था, सोय करण्याच प्रयत्न केला. यामध्ये मुंबई आणि मुंबई उपनगरच्या मराठा समन्वयकांनी मदत केली, त्यांना बरोबर घेऊन आम्ही काम केले. या वेळेला सुद्धा सरकारने जाणीवपूर्वक हे आंदोलन कशा पद्धतीने मोडीत काढता येईल, अशा प्रकारचा प्रयत्न केला होता. आम्ही सिडको एक्जीबिशनमध्ये पंधरा-वीस हजार आंदोलकांची व्यवस्था केली.
सरकारमधील लोकांकडून मतचोरीला महत्व ..
सरकारमध्ये असलेले लोक त्यांच्या प्रश्नांपेक्षा, जनतेच्या निकालापेक्षा मत चोरीला फार महत्त्व देत आहेत. पण 90 टक्के जनतेने जर क्रांती केली, तर निश्चितपणाने या देशात व राज्यात बदल पाहायला मिळेल, असा विश्वास शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला.