वडूज : खटाव तालुक्यातील प्रमुख तीन तलावामध्ये समाधानकारक जलसाठा आहे. मात्र आठ लहान तलावातील पाणी साठा मृत आहे. येरळवाडी मध्यम प्रकल्पात सध्या 53 टक्के पाणीसाठा आहे. नेरमध्ये 72 टक्के तर मायणी धरणात सुमारे 58 टक्के पाणी साठा आहे. असे असले तरी येळीव, पारगाव, सातेवाडी, शिरसवडी, डांबेवाडी, कान्हरवाडी, दरुज या लहान तलावात मृतसाठ्याइतपत पाणी शिल्लक राहिले आहे.
येरळवाडी मध्यम प्रकल्प हा खटाव तालुक्यातील महत्वाचा पाणीसाठा आहे. या प्रकल्पातून तालुक्यातील बहुतांशी भागाला पाणी पुरवठा केला जातो. तलावाची एकूण पाणी साठवण क्षमता 18.68 दशलक्ष घन मीटर (0.660 टीएमसी) आहे. पैकी 5.48 दशलक्ष घन मीटर (0.19 टीएमसी) एवढा उपयुक्त पाणीसाठा असतो. सद्या तलावाची पाणी पातळी 695.73 दशलक्ष घन मीटर एवढी असून तलावात सध्या 57 टक्के पाणीसाठा आहे. यावर्षी तलावात एप्रिल महिन्यात देखील पुरेसा प्रमाणात पाणीसाठा शिल्लक आहे. ब्रिटिश कालीन नेर धरणाला जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेमुळे तर मायणी धरणाला टेंभू योजनेच्या पाण्यामुळे नवसंजीवनी मिळाली आहे.
खटाव तालुक्याला गेली दोन महिने उरमोडीचे आवर्तन मिळालेले नाही. ते तातडीने देऊन उरमोडीच्या माध्यमातून येळीव, पारगाव, शिरसवडी व अन्य काही तलाव भरुन घेता येवू शकतात. त्या माध्यमातून पाणी टंचाईच्या झळा कमी होऊ शकतील. तसेच जिहे-कठापूरचे वाढीव काम लवकर पूर्ण करून दरूज तलावात पाणी आले तर अनेक गावांचा पिण्याच्या व शेती पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटू शकतो.