सातारा

घरात आढळले एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह

Arun Patil

कराड, पुढारी वृत्तसेवा : सणबूर (ता. पाटण) येथे सेवानिवृत्त शिक्षकासह त्यांची पत्नी, मुलगी, मुलगा अशा चौघांचे राहत्या घरात मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचे कारण अस्पष्ट असले तरी आत्महत्या की घातपात? याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच घटनेचे कारण पुढे येण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुका हादरला आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सणबूर येथील सेवानिवृत्त शिक्षक आनंदा पांडुरंग जाधव (वय 75), पत्नी सुनंदा आनंदा जाधव (वय 65) मुलगा संतोष आनंदा जाधव (वय 45) व विवाहित मुलगी पुष्पलता प्रकाश धस (रा. मंद्रूळ कोळे, ता. पाटण) अशी मृतदेह आढळलेल्या चौघांची नावे आहेत.

याबाबत माहिती अशी, रयत शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून सेवा बजावल्यानंतर निवृत्त झालेले आनंदा जाधव हे मागील काही दिवसांपासून आजारी होते. गुरुवारी त्यांना कराडच्या कृष्णा हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले होते. उपचारानंतर सायंकाळी त्यांना घरी सोडण्यात आले. श्वास घेताना त्रास होऊ नये यासाठी सणबूर येथे राहत्या घरी त्यांना ऑक्सिजनची सुविधा देण्यात आली होती. तसेच लाईट नसल्याने जनरेटरही आणला होता. आजारी आनंदा जाधव यांच्यासोबत त्यांची पत्नी सुनंदा, मुलगा व मुलगी असे चौघे जण गुरूवारी रात्री घरात होते. विवाहित मुलगी पुष्पलता धस यांच्या मुलाने गुरुवारी रात्री फोनवरून संपर्क साधून आजोबांच्या तब्येतीची विचारपूस सुद्धा केली होती.

शुक्रवारी सकाळी त्यांनी पुन्हा मोबाईलवर फोन करून विचारपूस करण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणीही मोबाईल उचलला नाही. वारंवार मोबाईल करूनही कोणीही प्रतिसाद देत नसल्याने पुष्पलता यांच्या मंद्रूळमधील घरातील व्यक्तींनी सणबूरमध्ये फोन करून शेजारील व्यक्तींना जाऊन पाहण्यास सांगितले. त्यानंतर काही लोक घरी गेले असता त्यांनी दरवाजा ठोठावला. मात्र आतून दरवाजा बंद होता. त्यानंतर दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश केल्यानंतर चौघांचेही मृतदेह आढळून आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने या घटनेची माहिती ढेबेवाडी पोलिसांना देण्यात आली. दरम्यान, ही आत्महत्या आहे की घातपात? याबाबत तर्कविर्तक लढवले जात आहेत. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच घटनेचे निश्चित कारण पुढे येईल, अशी शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.

पोलिस अधीक्षकांकडून पाहणी व सूचना

सणबूर येथील घटनेची माहिती समजताच पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी उपस्थित पोलिस उपअधीक्षक विवेक लावंड यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक अभिजित चौधरी यांना तपासाबाबत समीर शेख यांनी काही महत्त्वपूर्ण सूचनाही केल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT