सातारा : चार दिवसांपूर्वी शिवथर (ता. सातारा) येथे एटीएम फोडून 12 लाखांची रोकड घेऊन पलायन केलेल्या चोरट्यांच्या आंतरराज्य टोळीला सातारा पोलिसांनी जेरबंद केले. यामध्ये हरियाणातील दोघे व राजस्थानच्या एकाचा समावेश आहे. या संशयितांकडून सुमारे 12 लाख रुपये पोलिसांनी हस्तगत केेले आहेत. या टोळीने चार राज्यांत एटीएम फोडून लूटमार केली आहे.
हासमदिन अल्लाबचाए खान (वय 54, रा. मलार, ता. फलोदी, जि. जोतपूर, राज्य राजस्थान), सलीम मुल्ली इस्ताक (25, रा. दौरखी, ता. फिरोजपूर झिरका, जि. नहुमेवात, राज्य हरियाणा), राहुल रफिक (30, रा. चाजीदपूर, ता. फिरोजपूर झिरका, जि. नहुमेवात, राज्य हरियाणा) अशी संशयितांची नावे आहेत.
अधिक माहिती अशी, दि. 6 डिसेंबर रोजी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास शिवथर (ता. जि. सातारा) येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशिन फोडून चोरट्यांनी 12 लाखांची रोकड लांबवली होती. सातारा तालुका व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस याचा तपास करत होते. शिवथर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असताना संशयितांकडे हुंडाई क्रेटा कार असल्याचे निष्पन्न झाले. त्यांचे सीसीटीव्ही फुटेजदेखील पोलिसांना मिळाले. संशयित चोरटे पुणे बाजूकडे गेल्याचे निष्पन्न झाले. ते पुढे औरंगाबाद, धुळे, धार, इंदौर राज्य मध्यप्रदेश दिल्लीमार्गे मेवात हरियानाकडे जात असल्याची खात्रीलायक माहिती सातारा पोलिसांना मिळाली.
मध्यप्रदेश पोलिसांना सातारा पोलिसांनी दिलेल्या टिपमुळे संशयित जेरबंद झाले. त्यांनतर सातारा पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले. यावेळी एटीएममधून चोरी केलेल्या 12 लाख 6 हजार रुपयांपैकी 11 लाख 99 हजाराची रक्कम, गुन्हयात वापरलेली क्रेटा कार, एटीएम फोडण्यासाठी वापरलेले साहित्य जप्त केले.
पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि अरुण देवकर, सपोनि रमेश मगजे, रोहित फाणे, फौजदार विश्वास शिंगाडे, पारितोष दातीर, पोलीस संतोष सपकाळ, विजय कांबळे, शरद बेबले, लैलेश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, अमित माने, राकेश खांडके, अरुण पाटील, प्रविण कांबळे, गणेश कापरे, अविनाश चव्हाण, रोहित निकम, विशाल पवार, सचिन ससाणे, रविराज वर्णेकर यांनी कारवाईत सहभाग घेतला.