दहिवडी : दहिवडी शहरात शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या धाडसी चोरीने परिसरात खळबळ उडाली आहे. मायणीकडे जाणाऱ्या मुख्य चौकात असलेल्या ओमी मोबाईल शॉपी आणि त्याच दुकानातील बँकेचे ग्राहक सेवा केंद्राचे अज्ञात चोरट्याने शटर उचकटून सुमारे 2 लाख 6 हजारांची रोकड लंपास केली. विशेष म्हणजे, दुकानातील एकही मोबाईल चोरीला गेला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
या प्रकरणी मनोज बाळकृष्ण म्हेत्रस (वय 39, रा. दहिवडी) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. रात्री 9.30 ते सकाळी 9.15 दरम्यान ही घटना घडली. चोरट्याने थेट ग्राहक सेवा केंद्रातील लाकडी कपाटाच्या ड्रॉवरमधील रोकड चोरल्याचे स्पष्ट झाले. घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी रणजीत सावंत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास सपोनि दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जी. एम. दोलताडे करत आहेत.
डॉग स्क्वॉडला पाचारण करण्यात आले होते, मात्र त्यातून विशेष धागादोरा मिळाला नाही. या चोरीमुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंता वाढली असून पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे चोरट्याचा शोध सुरू केला आहे. शहरात शटर उचकटून होणाऱ्या चोऱ्यांच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांतही भीतीचे वातावरण आहे.