सातारा : शालेय शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत बोलताना ना. दादा भुसे. pudhari photo
सातारा

विद्यार्थ्यांची मातीशी नाळ तुटू देऊ नका

ना. दादा भुसे : शालेय शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत मार्गदर्शन

पुढारी वृत्तसेवा

सातारा : ‘आजच्या डिजिटल युगात विद्यार्थी हे जास्त करुन मोबाईकडे वळत आहेत, त्यांची आपल्या मातीशी व संस्कृतीशी नाळ तुटू देऊ नका, यासाठी शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण व आनंददायी शिक्षणाची व्याप्ती वाढवावी,’ असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केले.

ना. भुसे यांनी सातारा सैनिक स्कूलमध्ये शालेय शिक्षणच्या कोल्हापूर विभागाची आढावा बैठक घेतली. बैठकीला शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, महाराष्ट्र राज्य शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहूल रेखावार, कोल्हापूरचे शिक्षण उपसंचालक महेश चौथे, राजेश क्षीरसागर यांच्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यातील शिक्षक उपस्थित होते.

ना. भुसे म्हणाले, शालेय विद्यार्थ्यांसाठी शासन विविध योजना उपक्रम राबवत आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते. यामध्ये कोणी गंभीर आजाराचा विद्यार्थी आढळल्यास तालुका, जिल्हास्तरावर आरोग्य सुविधा द्याव्यात. या सुविधा उपलब्ध नसतील तर मुंबईला उपचारासाठी घेऊन यावे. विद्यार्थ्याला बरा करुन घरी सोडावे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी सी.बी.सी. मधील अभ्यासक्रमाचाही राज्य शासनाने समावेश केला आहे. जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये पट वाढवण्यासाठी गुढी पाडवा पट वाढवा, शाळेमध्ये देण्यात येणार्‍या सुविधांचे फलक असे विविध उपक्रम राबवत आहोत, हे उपक्रम पुढील काळातही राबवत रहा, असे ना. भुसे यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांची सहल शेतकर्‍यांच्या बांधावर, शासकीय कार्यालय, गॅरेज, किराणा दुकान अशा ठिकाणी घेऊन तेथे चालणार्‍या कामकाजाविषयी सांगावे. शिक्षकांचे व संस्था चालकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी बैठका घेतल्या आहेत. हे प्रश्न टप्याटप्याने सोडवले जातील, असेही ना. भुसे यांनी सांगितले.

दरम्यान, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यातील आदर्श शाळेतील शिक्षकांनी त्यांच्या शाळेत राबवण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT