वडूज : खटाव तालुक्यातील पूर्व भागात तारळी कॅनॉलला पाणी न सुटल्याने या भागातील ऊस व इतर पिकांचे वाळवण होऊ लागले आहे. पाण्याअभावी या भागातील डाळमोडी, बोंबाळे, कातरखटाव, तुपेवाडी, मानेवाडी, पळसगाव, दातेवाडी, सूर्याचीवाडी, धोंडेवाडी, मायणी, अनफळे, माळीनगर, मोराळे, मरडवाक आदी गावांतील पिके जळू लागली आहेत.
माण तालुक्यात दि. 25 फेब्रुवारीपासून आजतागायत पाणी सुरु आहे. मात्र खटाव तालुक्यामधून फक्त कॅनॉलच गेला आहे. खटावला पाणी नाही, त्यामुळे शेतकर्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. शेतकर्यांनी शेतात दरवर्षी खर्च करायचा. भांडवल गाडायचं आणि पिके वाळवून घालवायचे असे किती दिवस चालणार असा सवाल व्यक्त होत आहे. असे असले तरी सत्ताधारी पक्षाच्या विरोधात मरगळ असल्याने कोणीही जनतेच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याच्या मानसिकतेत नसल्याचे चित्र आहे.
खटाव तालुक्यातील शेतकरी पाण्यासाठी तडफडत असताना पाटबंधारे विभागाचे अधिकारी बघ्याची भूमिका घेत असतील तर कदाचित ते जनआंदोलनाची वाट पाहत आहेत, असे मत सरपंच संघटनेचे अध्यक्ष विजयराव शिंदे यांनी व्यक्त केले.