सातारा : कुरिअर बॉयकडून ऑनलाईन मागवलेले पार्सल चोरी करुन पळून गेलेल्या चोरट्याला सातारा शहर पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. अजिंक्य बाबासाहेब डांगे (वय 20, मूळ रा. चिंचणेर, निंब, सध्या रा. समर्थनगर, सातारा) असे संशयीताचे नाव असून सातारा गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी (दि. 21 रोजी) एका कुरिअर कंपनीमधून सुमारे 3 हजार रुपये किंमतीचे कपड्याचे ऑनलाईन आलेले पार्सल दिलेल्या पत्त्यावर देण्यास एक कुरिअर बॉय गेला होता. या पत्याच्या आसपास गेल्यानंतर त्याने कंपनीच्या फोनवरुन पार्सल मागवण्याऱ्या व्यक्तीस फोन केला व तुम्ही दिलेल्या पत्त्याच्या आसपास मी आलो आहे. तेथून पुढील पत्ता विचारला त्यावर पार्सल मागवणाऱ्या व्यक्तीने मी पुण्याला असून पार्सल घेण्यासाठी माझा मित्राला पाठवतो, असे सांगितले.
थोड्या वेळानंतर एक हुडी घालून मोटारसायकलवरून एक युवक त्याचा चेहरा दिसणार नाही, अशा पद्धतीने आला. कुरीअर बॉय कुरीअरबाबत बीलाचे संभाषण करत असताना त्या युवकाने गाडीवर ठेवलेले पार्सल घेवून तेथून पोबारा केला. कुरीअर बॉयने लगेच पार्सल मागवणाऱ्या युवकाला फोन करून घडलेला प्रकार सांगितला. त्यावर त्याने मी अजून कोणत्याच मित्राला पार्सल नेण्यासाठी फोन केलेला नाही. ते पार्सल कोणीतरी अन्य व्यक्तीने चोरी केल्याचे कुरीअर बॉयला वाटले. त्यामुळे त्याने सातारा शहर पोलिस ठाण्यात येवून घडलेल्या प्रकाराबाबतची तक्रार दिली. त्यानंतर मस्के यांनी तत्काळ डी. बी. पथकास या आरोपीचा शोध घेवून त्याला ताब्यात घेण्याबाबत सूचना केल्या. त्याप्रमाणे डी.बी. पथकाने घटनास्थळी जावून तेथील पाहणी करून संशयित युवकाची माहिती प्राप्त केली. त्याचा शोध घेत असताना तो मूळ चिंचणेर निंब (ता. सातारा) गावचा असून तो गुन्हेगार प्रवृत्तीचा असल्याची माहिती प्राप्त झाली. परंतु तो गावामध्ये राहण्यास नसून तो सातारा शहरात नक्की कोठे राहतो, याबाबत माहिती नसल्याचे स्थानिक रहिवाशी यांनी सांगितले.
या युवकाचा विविध ठिकाणी गोपनीय माहितीच्या आधारे शोध घेतला असता तो एमआयडीसी सातारा येथे काही टवाळखोर मुलांमध्ये बसायला असतो, असे समजल्यावर काही संशयितांना ताब्यात घेवून त्याची अधिक माहिती प्राप्त करून त्याला ताब्यात घेतले. या युवकाकडे पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याने हेे पार्सल चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी ते पार्सल जप्त केले आहे.
ही कारवाई पोलिस अधिक्षक तुषार दोशी, अप्पर पोलिस अधिक्षक डॉ. वैशाली कडूकर, सातारा उपविभागीय अधिकारी राजीव नवले, वरीष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलिस उपनिरीक्षक सुधीर मोरे, हवालदार श्रीनिवास देशमुख, राहूल घाडगे, सुजीत भोसले, निलेश यादव, निलेश जाधव, विक्रम माने, प्रविण कडव, पो. ना. पंकज मोहिते, पो. कॉ. तुषार भोसले, सागर गायकवाड, सचिन रिटे, संतोष घाडगे, विशाल धुमाळ, मच्छद्रिंनाथ माने, आशिकेष डोळस, वैभव माने, सुशांत कदम, सुहास कदम यांनी केली.