महाबळेश्वर : महाबळेश्वर - पोलादपूर मार्गावरील अंबेनळी घाटात दुचाकी 500 फूट खोल दरीत कोसळून दाम्पत्य ठार झाले होते. या दाम्पत्याचे मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आले. गुरुवारी मध्यरात्री पतीचा तर शुक्रवारी सकाळी पत्नीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. महाबळेश्वर ट्रेकर्स व प्रतापगड रेस्क्यू टीम यांच्या पथकाने ही मोहीम राबवली.
मोहन चव्हाण व जयश्री चव्हाण (रा. सोनगीरवाडी, वाई) असे दुर्दैवी दाम्पत्याचे नाव आहे. हे दाम्त्य भंगार व्यवसायिक असल्याचे सांगण्यात आले. हे दाम्पत्य पोलादपूरकडून वाईकडे दुचाकीवरून येत असताना प्रतापगड किल्ला परिसरातील एका धोकादायक वळणावर दुचाकीवरील ताबा सुटला. दुचाकी संरक्षक कठड्याला धडकली. त्यावेळी गाडी रेलिंगला अडकली अन् दाम्पत्य थेट खोल दरीत कोसळले.
घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर ट्रेकर्स आणि प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. सायंकाळी 7 वाजता सुरू झालेल्या या मोहिमेत दोरखंडाच्या सहाय्याने बचाव पथकाने सुमारे 500 फूट खोल दरीत उतरून शोधकार्य केले. रात्री एकच्या सुमारास मोहन चव्हाण यांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. मात्र अंधारामुळे पुढील मदतकार्य थांबवण्यात आले. पहाटे पुन्हा मोहीम सुरू करण्यात आली. त्यानंतर काही अंतरावर जयश्री चव्हाण मृत अवस्थेत आढळून आल्या.
घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी गर्दी केली. कुटुंबीयांचा आक्रोश हृदयद्रावक होता. दोन्ही मृतदेह पोलादपूर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.