कराड : पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावर पाचवड फाटा ते अटके टप्प्या दरम्यान नारायणवाडी गावच्या हद्दीत कापसाने भरलेला कंटेनर महामार्गावरच पलटी झाला. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाल्याने महामार्गावर लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रविवार, दिनांक 25 रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अपघातात कंटेनरचे मोठे नुकसान झाले आहे.
पुणे-बंगळूर आशियाई महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या कामांतर्गत महामार्गावरील वाहतूक अनेक ठिकाणी सर्व्हिस रस्त्यावरती वळविण्यात आली आहे. या महामार्गावरून पुणे बाजूकडून कोल्हापूर बाजूकडे कापसाने भरलेला कंटेनर निघाला होता. पाचवड फाटा ते अटके टप्पा दरम्यान नारायणवाडी गावच्या हद्दीत असलेले महामार्गावरील वळण रस्त्याचा अंदाज न आल्याने पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हा कापसाने भरलेला कंटेनर महामार्गावरच पलटी झाला. त्यामुळे कंटेनरमधील कापसाचे गठ्ठे महामार्गावर पसरले गेले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली.
अपघाताची माहिती मिळतच महामार्ग देखभाल विभागाचे कर्मचारी, डीपी जैन कंपनीचे कर्मचारी व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी महामार्गावरील कापूस व कंटेनर बाजूला करण्यासाठी भल्या मोठ्या दोन क्रेन बोलवल्या. क्रेनच्या सहाय्याने प्रथम महामार्गावर आडवा झालेला कंटेनर बाजूला करण्यात आला. त्यानंतर महामार्गावरील कापसाचे गठ्ठे हटवण्यात आले. दरम्यानच्या कालावधीत महामार्गावर लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक ठप्प झाल्याचे लक्षात येताच पोलीस व महामार्ग देखभाल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वाहतूक वळवून ती सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.
वाहतूक सुरळीत करण्यासाठी दस्तगीर आगा, शुभम शिंदे, सुनील कदम, राहुल कदम, विशाल तुपे यांच्यासह कराड शहर वाहतूक शाखेचे प्रशांत जाधव तसेच डीपी जैन कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांनी प्रयत्न केले.
अपूर्ण कामामुळे महामार्गावर होताहेत अपघात...
महामार्ग रुंदीकरणाचे काम अतिशय धीम्या गतीने सुरू असून अपूर्ण कामामुळे महामार्गावर अपघाताच्या घटना वारंवार घडत आहेत.महामार्गावरील वाहतूक कोंडी तर नित्याचीच बाब होऊन बसले आहे. या अपघाताच्या मालिकेमुळे नागरिक त्रस्त झाले असून महामार्गाचे रुंदीकरणाचे काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी वाहनधारकातून केली जात आहे.