सातारा : ओगलेवाडी (ता. कराड) येथील टेंभू उपसा सिंचन यांत्रिकी व विद्युत पथक विभागातील कार्यकारी अभियंता आनंद काळमेघ व कनिष्ठ अभियंता माधुरी देवरे या दोघांना लाचप्रकरणी अटक केली होती. त्यांना न्यायालयात हजर केले असता 2 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा तपास लाचलुचपत विभाग (एसीबी) करणार आहे.
सुरक्षा रक्षकांची बिले काढण्यासाठी तक्रारदार कनिष्ठ कार्यकारी अभियंता माधुरी देवरे व त्यानंतर कार्यकारी अभियंता आनंद काळमेघ या दोघांना भेटले असता दोघांनीही लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी एसीबी कार्यालयात तक्रार दिल्यानंतर शुक्रवारी लाच स्वीकारताना दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले. वर्ग 1 व वर्ग 2 च्या दोन्ही अधिकाऱ्यांना एकाच कारवाईत पकडल्यानंतर खळबळ उडाली. एसीबी विभागाने याप्रकरणी पंचनामा करून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर संशयितांना अटक केली.
शनिवारी दोन्ही संशयितांना न्यायालयात हजरकेले असता त्यांना 2 दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. यामुळे एसीबी विभाग या प्रकरणाच्या मुळाशी जाणार आहे. यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का? यासह विविध प्रश्नांची उकल केली जाणार आहे.
पाटबंधारे विभाग एवढा भ्रष्टाचारी कसा?
पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंता लाच घेताना अटक झाल्याने पाटबंधारे विभागात खळबळ उडाली आहे. पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांबाबत यापूर्वी अनेकदा तक्रारी झाल्या आहेत. त्यांचे घोटाळेही उघडकीस आले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईमुळे या घोटाळ्यांवर शिक्कामोर्तब झाले आहे. कार्यकारी अभियंत्यासारखा वरिष्ठ अधिकारी लाच घेताना पकडला जात असेल तर अन्य विभागांतील अधिकाऱ्यांचे काय? संपूर्ण पाटबंधारे विभागाचे पोस्टमार्टेम करावे, अशी मागणी जनतेतून होत आहे.