सातारा : सातारा पालिका निवडणुकीसाठी अनेक इच्छुक असले तरी नगरसेवक असो किंवा नगराध्यक्ष, काम करणारा उमेदवार असावा. अनेकजण वॉर्डात वर्षानुवर्षे गटरची कामे कशासाठी करतात, हे सर्वांना माहीत आहे. माझी गल्ली, माझा वॉर्ड असा संकुचित विचार करणारे उमेदवार सातारा पालिकेत नकोत. नगरसेवकपदाचा उमेदवार नगरपालिकेत येऊन बिले काढणारा नसावा, अशी परखड भूमिका नगर विकास आघाडीचे नेते व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत मांडली. दरम्यान, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी सातार्यात प्रायोगिक तत्त्वावर इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करणार असल्याचेही ना. शिवेंद्रराजेंनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात सातारा-लोणंद-शिवरळ महामार्ग व सातारा-कोल्हापूर महामार्गासंदर्भात मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी आढावा बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांनी सातारा पालिकेच्या निवडणूक तयारीबाबत विचारले असता ना. शिवेंद्रराजे म्हणाले, नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता अद्याप लागलेली नाही. मुख्यमंत्री, जिल्हाध्यक्ष, आमदार, खासदार यांच्याशी चर्चा केली जाईल. योग्यवेळी योग्य निर्णय घेतला जाईल. संधी कुणाला द्यायची यापेक्षा निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. निवडणुकीसाठी अनेकजण इच्छुक आहेत. शहरासाठी काम करणारा नगरसेवक किंवा नगराध्यक्षपदाचा उमेदवार असावा, अशी माझी भूमिका आहे. नुसते पद हवे म्हणून उमेदवारी करणारा नसावा. संबंधित पदाला न्याय देणारा उमेदवार असायला हवा. निवडून आल्यानंतर पुढील पाच वर्षे त्या उमेदवारांने चांगल्या पद्धतीने काम करायला हवे. राज्य सरकारकडून निधी आणून देण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करू.
आपलं सरकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्याला भरभरून निधी देत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सातार्यावर विशेष प्रेम आहे. त्यामुळे काम करून घेण्याची, जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून घेण्याची आपली मानसिकता असायला हवी. उगीच गटरचे काम करायचे, पुन्हा त्याच गटारात पाईप घालायची काम काढायचे, पुन्हा ती पाईप काढून मोठी पाईप घालायची असले नगरपालिकेतील उद्योग बंद झाले पाहिजेत. बिले काढण्यासाठी नगरसेवक नसावा. सातारा हे साताराच रहावं. सातार्याचे सिंगापूर करायची आवश्यकता नाही. आपला सातारा... चांगला सातारा करूया, असे आवाहन ना. शिवेंद्रराजे यांनी केले.
ना. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, साहित्य संमेलनाच्या अनुषंगानेही सातारा शहरातील नियोजनासंदर्भात यंत्रणांना सूचना केल्या आहेत. सातारा शहरात प्रयोगिक तत्त्वावर इलेक्ट्रिक सिटी बस सातारा पालिकेकडून सुरू करण्यासंदर्भात चर्चा झाली असून मुख्याधिकार्यांना सूचना केल्या आहेत. रेल्वे स्टेशन, बस स्टेशन, बोगदा तसेच शाहुपूरी या प्रमुख ठिकाणाहून ही बससेवा सुरू करण्याचे नियोजन आहे.