कराड : सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे, ही स्व. यशवंतराव चव्हाण यांचीच शिकवण व विचार होते. मात्र सह्याद्रि कारखान्यात स्व. यशवंतराव चव्हाण यांनी स्व. पी. डी. पाटील यांचे नाव सुचविल्यानंतर दुसर्या कोणाला संधीच मिळाली नाही. माझा कारखान्याचा काही संबंध नाही, पण सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे. माझा काही ऊस नाही, माझ्या कोणत्याही कारखान्याशी संबंध नाही. मात्र लोकप्रतिनिधी म्हणून मत व्यक्त करतो की मी कारखान्यात असतो तर सर्वांना संधी दिली असती असे सूचक वक्तव्य खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले आहे.
स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कराडमधील समाधीस्थळ परिसरात अभिवादन केल्यानंतर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, सातारा जिल्ह्याची एक वेगळी परंपरा असून अनेक चळवळी निर्माण झाल्या असून सत्यशोधक, स्वातंत्र्यासह स्त्री शिक्षणाची चळवळ जिल्ह्यात उभी राहिली. स्व. यशवंतराव चव्हाण यांचे विचार हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विचार होते.
स्व. यशवंतराव चव्हाण यांनी सत्तेचे विकेंद्रीकरण केले. सत्तेचे केंद्रीकरण होते, त्यावेळी मुठभर लोकांच्या हाती सत्ता असते आणि हे लोक सर्वसामान्यांना सोईप्रमाणे वाकवितात. सत्तेचे विकेंद्रीकरण होते, त्यावेळी लोकांचा सहभाग असतो. चेअरमन, संचालक यांच्याप्रमाणेच सभासदांना सारखेच अधिकारी असतात. पण सहकारी संस्था स्थापन होऊन लोकांकडून शेअर्स गोळा केल्यानंतर चेअरमन स्वतःला मालक समजतात. मात्र सभासदाला चेअरमनांप्रमाणेच अधिकार असतात. सहकारी संस्था खाजगी पद्धतीने चालविण्यात आल्या. वास्तविक राज्य शासनासह केंद्र सरकारकडून कारखान्यांना अनुदान मिळते. लोकांकडून पैसे गोळा करून कारखाने काढले जातात. त्यामुळेच सहकारी कारखाने खाजगी पद्धतीने चालविणार्यांनी स्वतःच्या जोरावर एक खाजगी कारखाना काढायला पाहिजे होता. असे झाले असते तर आज निवडणुकीचा विषयच लागला नसता, असा उपरोधिक टोलाही खासदार उदयनराजे भोसले यांनी लगावला आहे.
ते म्हणाले, सहकारी संस्थांची निवडणूक लागते, तेव्हा सर्वांना संधी मिळाली पाहिजे ही स्व. यशवंतराव चव्हाण यांचीच शिकवण व विचार होते. त्यामुळे सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे की नाही असा प्रश्न उपस्थित केला. माझा काही ऊस नाही, माझ्या कोणत्याही कारखान्याशी संबंध नाही. मी एक लोकप्रतिनिधी म्हणून मत व्यक्त करत आहे. जरी संबंध नसला तरी जर कोणी सभासद स्वतःचे अधिकार मिळवून देण्यासाठी माझ्याकडे येत असतील तर मी निश्चितपणे अधिकार मिळवून देण्यासाठी विचार करू, असे संकेत देत ज्यांनी आजवर चेअरमन, संचालक म्हणून सामान्य सभासदांना संधी दिली नाही, त्यांनीच आता उत्तर दिले पाहिजे, असे मत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.