सातारा : पुढारी वृत्तसेवा
बिल्डर्स आणि ठेकेदारांकडून ऐन पावसाळ्यात मातीकाम करण्यात येत असल्यामुळे वाहनांच्या चाकांना लागलेला चिखल मुख्य मार्गावर येऊन राडारोडा निर्माण झाला आहे. चौकाचौकांत, नाक्या नाक्यावर ही दयनीय परिस्थिती उद्भवल्याने अशा मगु्रर ठेकेदार व बिल्डरांना कारवाईचा दणका द्यावा, अशी मागणी सातारकरांतून होत आहे.
सातार्यात पावसाची उघडझाप आहे. पावसाळ्यात सातार्यातील काही बिल्डर्स आणि ठेकेदारांना कामाचा जोर चढला आहे. उन्हाळ्यात करायची कामे त्यांनी ऐन पावसाळ्यात सुरू केल्याने त्याचे वाईट परिणाम सातारकांना भोगावे लागत आहेत. अनेक बिल्डर्सच्या गृहप्रकल्पांच्या साईट शहरात ठिकठिकाणी सुरू आहेत. या कामांसाठी करण्यात येणारे खोदकाम व भराव घालण्यासाठी जेसीबी, डंपर, टिपर हे चिखलात घातले जातात. काम झाल्यानंतर चिखलाने माखलेली ही वाहने तशीच मुख्य रस्त्यावर आणली जातात. त्यामुळे प्रमुख मार्गावर चिखलाचा राडारोडा 100 ते 200 मीटर अंतरावर पसरलेला असतो. त्यातच पाऊस झाला तर संपूर्ण मार्गच दलदलमय होऊन जातो.
या चिखलाने रस्त्यावर पचपच निर्माण होते. अशा चिखलातून पादचार्यांना मार्गक्रमण करावे लागते. अशीच परिस्थिती ठेकेदारांची आहे. बर्याच ठेकेदारांची शहरात कामे सुरू आहे. या ठेकेदारांकडूनही चिखलाने भरलेली वाहने मुख्य रस्त्यावर आणली जात आहेत. विशेष करून सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच राष्ट्रीय महामार्गावर ही परिस्थिती असल्याने या दोन्ही विभागांनी संबंधित ठेकेदार व बिल्डर्सवर कारवाई करावी, अशी मागणी सातारकरांतून होत आहे.
पावसाचे प्रमाण कमी झाल्याने रस्त्यावर प्रचंड धूळ उडू लागली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे महामार्ग तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडील रस्त्यांवरील धुळीने सातारकर हैराण झाले आहे. बर्याच ठिकाणी माती साचल्याने धुरळा उडत आहे. या धुळीमुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.