सातारा : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम मंडळातील नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांना गिफ्ट मिळाले आहे. बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी राज्य सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आता 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर या कामगारांना निवृत्तीवेतन म्हणजेच पेन्शन मिळणार आहे. याबाबतची घोषणा राज्याचे श्रम व कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी विधिमंडळात केली आहे. या निर्णयानंतर राज्यातील शेकडो कामगारांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक बळ मिळणार आहे.
खरे तर, बांधकाम कामगारांना निवृत्तीनंतर कोणतेही आर्थिक पाठबळ मिळत नाही, त्यामुळे त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे भविष्य अनिश्चित होते. ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने बांधकाम कामगारांसाठी पेन्शन योजना सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी 2011 मध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ स्थापन करण्यात आले होते. 18 ते 60 वर्षे वयोगटातील कामगारांची या मंडळात नोंदणी केली जाते आणि त्यांना वेगवेगळ्या योजनांचा लाभ मिळतो. मात्र, 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर ही नोंदणी थांबत होती आणि कोणत्याही मंडळाचा लाभ मिळत नव्हता. ही अडचण दूर करत सरकारने आता नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दरवर्षी 12 हजार रुपये म्हणजेच प्रत्येक महिन्याला 1,000 रुपये पेन्शन देण्याचा निर्णय घेतला आहे.
कामगारांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरणार आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना आणि कायद्यांतील तरतुदींचा विचार करून याबाबत सविस्तर कार्यपद्धती लवकरच तयार करण्यात येईल, अशी माहिती मंत्री फुंडकर यांनी दिली आहे. या योजनेमुळे आता निवृत्तीनंतरही कामगारांना आर्थिक मदत मिळणार आहे. तसेच त्यांच्या कुटुंबांचे भवितव्य सुधारले जाईल.
शासनाकडून बांधकाम कामगारांसाठी कल्याणकारी योजना राबवल्या जातात. त्यामुळे जिल्ह्यातील अधिकाधिक बांधकाम कामगारांनी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम मंडळाकडे आपली नोंदणी करून घ्यावी. जेणेकरून त्यांना शासनाच्या विविध 32 योजनांचा लाभ घेता येईल. सध्या जिल्ह्यात 75 हजार बांधकाम कामगार आहेत.-नितीन कवले, सहायक कामगार आयुक्त