सातारा : कॅबिनेट दर्जा असलेले राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे रविवारी ‘न भूतो न भविष्यति’ असे टोलेजंग व दिमाखदार स्वागत झाले. पुणे एअरपोर्ट ते राजधानी सातार्यापर्यंत त्यांच्या स्वागताचा नॉनस्टॉप जलवा दिसून आला. सर्वत्र कार्यकर्त्यांची उडालेली झुंबड, जनतेचे अलोट प्रेम, जेसीबी, क्रेनद्वारे ठिकठिकाणी भल्या मोठ्या हारांचा झालेला वर्षाव, फटाक्यांची आतषबाजी, वाहनांचा प्रचंड ताफा अशा भारावलेल्या व उत्साही वातावरणात ना. शिवेंद्रराजे यांचे स्वागत झाले. अवघा जिल्हा बाबाराजेमय होऊन गेला.
सार्वजनिक बांधकाममंत्री झाल्यानंतर ना. शिवेंद्रराजे प्रथमच रविवारी जिल्ह्यात दाखल झाले. शनिवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी सोपवली. त्यामुळे सातार्यासह अवघ्या जिल्ह्यात उत्साहाला उधाण आले होते. रविवारी तर हा उत्साह शिगेला पोहोचला. अवघा जिल्हा मंत्री शिवेंद्रराजेंच्या स्वागतासाठी सजला होता. प्रत्यक्ष नियोजित वेळेपेक्षा मंत्री महोदयांचा ताफा उशिराने जिल्ह्यात दाखल झाला. पुणे एअरपोर्ट येथे ना. शिवेंद्रराजेंचे सकाळी 10.30 वाजता आगमन झाले. त्यांच्यासमवेत मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, माजी जि. प. सदस्य राजूभैय्या भोसले, फिरोज पठाण, ओंकार भंडारे, अक्षय जाधव आदी कार्यकर्ते व पदाधिकारी होते.
जिल्ह्याच्या सिमेवर ना. शिवेंद्रराजेंच्या स्वागतासाठी नागरिकांची झुंबड उडाली. महामार्गावर सारोळा पुलाजवळ ना. शिवेंद्रराजे प्रेमींनी जेसीबीने फुले उधळत व क्रेनच्या सहाय्याने हार घालून जोरदार स्वागत केले. उपस्थितांनीही फुलांची उधळण व फटाक्यांची आतषबाजी केली. उपस्थित गर्दीने ना. शिवेंद्रराजेंच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय, ना. शिवेंद्रराजेंचा विजय असो, जय भवानी जय शिवाजी, जय श्रीराम’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. निरा नदीच्या काठावर जिल्ह्याच्या सीमेवर बाबाराजेंचे ढोल ताशांच्या निनादात स्वागत झाले. हरीपूर येथील चवणेश्वर तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ढोल ताशांवर धरलेला ताल लक्ष वेधून घेत होता.
शिरवळ येथेही सत्कार करण्यात आला. पुढे महामार्गावरील खंडाळा, भुईंज, पाचवड येथे स्वागत करण्यात आले. कुडाळ, मेढा येथे जल्लोषी स्वागत झाले. करहर येथे ना. शिवेंद्रराजेंचा ताफा दाखल झाल्यानंतर फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. बैलगाडीतून बांधकाम मंत्र्यांची मिरवणूक निघाली. या मिरवणुकीसाठी आख्खा करहर परिसर लोटला होता. मेढ्यातील जल्लोषी स्वागतानंतर रात्री उशिरा ना. शिवेंद्रराजेंचे राजधानी सातार्यात दणक्यात स्वागत झाले.