विधानसभा निवडणूक निकाल File Photo
सातारा

बालेकिल्लेच उद्ध्वस्त झाल्याने काँग्रेसला बसला धक्का

Maharashtra Assembly Election Result | नेत्यांवर आली आत्मचिंतनाची वेळ

पुढारी वृत्तसेवा

कराड : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात स्वातंत्र्यानंतरच्या सात दशकांमध्ये प्रथमच भाजपचे उमेदवार आमदार डॉ. अतुलबाबांनी मोठा दिग्विजय मिळविला आहे. या विजयामुळे सातारा जिल्ह्यासह कराड तालुक्यातही भाजप अधिक भक्कम झाली आहे. तर दुसरीकडे उंडाळे, येळगाव, कोळे - विंग, कराड या आजवर काँग्रेसचे बालेकिल्ले मानल्या जाणार्‍या विभागातच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची पिछेहाट झाली आहे. त्यामुळेच काँग्रेसला जबर धक्का बसला असून या विधानसभा निवडणूक निकालाचे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीवरही पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघावर 1980 च्या दशकापर्यंत स्व. यशवंतराव मोहिते आणि त्यानंतर सन 2014 पर्यंत स्व. विलासराव पाटील-उंडाळकर या दोघा माजी सहकारमंत्र्यांनी काँग्रेसचे आमदार म्हणून एकतर्फी वर्चस्व राखले होते. त्यानंतर मतदारसंघावर मागील दहा वर्ष माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे वर्चस्व होते. वास्तविक मागील दोन्ही विधानसभा निवडणुकीत स्व. विलासराव पाटील उंडाळकर आणि अ‍ॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर या दोन्ही काँग्रेस नेत्यांनी रयत संघटनेच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात पृथ्वीराज चव्हाण यांना आव्हान दिले होते.

मात्र, या निवडणुकीत स्व. विलासराव पाटील-उंडाळकर गट पूर्ण ताकदीने पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठीशी उभा होता. त्यामुळेच उंडाळकर गटाचा बालेकिल्ला असणार्‍या कोळे - विंग जिल्हा परिषद गट, येळगाव जिल्हा परिषद गट आणि काले विभागात पृथ्वीराज चव्हाण यांना मताधिक्य मिळेल, असा काँग्रेस कार्यकर्त्यांना विश्वास होता. त्याचबरोबर कराड शहरामध्ये किमान 50 टक्के मते मिळतील असा विश्वास काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत होता. याशिवाय वारूंजी विभागातही थोडेफार मताधिक्य मिळेल, असेही सांगितले जात होते.

मात्र प्रत्यक्षात झाले उलटेच. विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार आमदार डॉ. अतुलबाबांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा 39 हजाराहून अधिक मतांच्या मताधिक्याने पराभव केला आहे. या विजयात कृष्णाकाठावरील रेठरे बुद्रूक जिल्हा परिषद गटासह वडगाव हवेली, कार्वे, कोडोली, दुशेरे या गावांनी जवळपास 17 हजाराहून अधिकचे मताधिक्य आमदार डॉ. अतुलबाबांना दिले आहे. तर काँग्रेसची भिस्त असणार्‍या येळगाव जिल्हा परिषद गटासह कराड, मलकापूर, वारूंजी विभागातील अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी आमदार डॉ. अतुलबाबांनी मुसंडी मारत पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरच मताधिक्य घेतले आहे. येळगाव - उंडाळे, काले विभाग उंडाळकर गटाचा मजबूत गड मानला जात होता.

मात्र या निवडणुकीत वेगळेच चित्र पहावयास मिळाल्याने आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत येथे मोठी चुरस पहावयास मिळणार असून काँग्रेसला विशेषतः उंडाळकर गटाला पुन्हा वर्चस्व निर्माण करण्यासाठी परिश्रम घ्यावे लागणार आहेत. तर दुसरीकडे या विभागातील भाजपाच्या मुसंडीमुळे उंडाळकर विरोधी गटाचा आत्मविश्वास वाढल्याचेच पहावयास मिळत आहे. विंग - कोळे विभातही अशीच परिस्थिती असून पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अ‍ॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांना जबर धक्का बसला आहे. काले विभागात सुद्धा आमदार डॉ. अतुलबाबांनी मारलेली मुसंडी काँग्रेससाठी चिंतेचा विषय बनली आहे. एकीकडे आमदार डॉ. अतुलबाबांनी कृष्णाकाठावरील गावांमध्ये मोठे मताधिक्य घेत आपला अभेद्य गड कायम ठेवला आहे. तर काँग्रेसच्या विजयात हातभार लावणार्‍या कराड शहर, मलकापूर शहर, वारूंजी विभागासह सैदापूर, येळगाव - उंडाळे विभाग आणि कोळे - विंग विभागात काँग्रेसचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करत आपली ताकद दाखविली आहे. त्यामुळेच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस व जोरदार चुरस पहावयास मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT