कराड : काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोहचला आहे, त्यामुळे काँग्रेस कधीही संपू शकत नाही. स्वातंत्र्य मिळवण्यापासून देश प्रगतीपथावर आणण्यापर्यंत काँग्रेसने सत्ताकाळात काम केले आहे. आता देश स्थिर झाल्यानंतर फेक नरेटिव्ह व खोटे आरोप करून भाजप आयते सत्तेवर आली आहे. आज भाजपला सुद्धा त्यांचा पक्ष वाढवायला काँग्रेस कार्यकर्त्यांची व नेत्यांची गरज भासत आहे. म्हणूनच भाजप मोठा पक्ष दिसत आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
कराड येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष शिवराज मोरे, काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अजितराव पाटील, काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे पश्चिम महाराष्ट्रचे अध्यक्ष झाकीर पठाण, कराड उत्तर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष निवासराव थोरात प्रमुख उपस्थित होते.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 2014 साली भाजपने काँग्रेसवर खोटे भ्रष्टाचाराचे आरोप करून जनतेची दिशाभूल करून सत्तेवर आले. पण नंतर न्यायालयात काँग्रेस सरकारमधील मंत्र्यांवर झालेले सर्व आरोप सिद्ध न झाल्याने निकाली काढण्यात आले. पण तोपर्यंत काँग्रेसचे सरकार सत्तेवरून गेले होते. बिनबुडाचे भ्रष्टाचाराचे काँग्रेस सरकारवर आरोप केलेले भाजप त्यांचे सरकार आल्यानंतर त्यांच्या मंत्र्यांवर मोठमोठे भ्रष्टाचाराचे आरोप होऊन आणि ते आरोप पुरावयासहित असून सुद्धा एकही मंत्र्यावर कोणतीही कारवाई केली गेली नाही.
जाती-धर्मात द्वेष पसरवून देशाची शांतता भंग केली जात आहे. धार्मिक द्वेष निर्माण करणारा देश कधीही प्रगती करू शकत नाही हा जागतिक इतिहास आहे. विकासाबाबतचे कोणतेही धोरण भाजपने कधीही राबविले नाही, विकासाचे जे आकडे सरकारकडून दाखविले गेले ते खोटे आकडे असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहेत. देशातील जनतेची दिशाभूल करून सत्ता हस्तगत करण्याचा पायंडा भाजपने घातला हि इतिहासात नोंद कायम राहील. तसेच भाजपकडे स्वतःचे कोणतेही कार्यकर्ते किंवा केडरबेस नसल्याने त्यांना देशातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसची गरज भासते.
सत्तेचा गैरवापर करून विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे नेते गळाला लावले, ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करूनच भाजप जनतेकडून मते मागत आली आहे अशा नेत्यांना सोबत घेऊन त्या नेत्यांना क्लीनचिट देऊन पक्षात घेण्याचा कार्यक्रम सुरु आहे.