कराड : गणेश विसर्जन मिरवणुकीत रविवार पेठेत झालेल्या भांडणानंतर वाद मिटवण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीतच छत्रपती गणेश व नवरात्र मंडळासह देवांग गणेश मंडळाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचे समोर आले आहे. रविवारी रात्री उशिरा याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून सुमारे 13 जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
छत्रपती गणेश व नवरात्र उत्सव मंडळातील क्रांतीकुमार दिनकरराव मोरे (रा. दिवटे गल्ली, कराड) याने दिलेल्या तक्रारीवरून देवांग गणेश मंडळातील युवराज पांडुरंग मर्ढे, सुभाष प्रल्हाद वेदपाठक, रमेश प्रल्हाद महादर, अमोल जगन्नाथ मर्ढे, संजय शामराव जाधव (सर्व रा. कोष्टी गल्ली, रविवार पेठ, कराड) यांच्यासह एका अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर देवांग गणेश मंडळाचे युवराज मर्ढे याने दिलेल्या तक्रारीवरून क्रांतीकुमार मोरे, आप्पासाहेब बबन खोत, अमित मुकुंद नलावडे, संकेत हनुमंत पवार, विनोद हनुमंत भिंताडे (सर्व रा. दिवटे गल्ली, रविवार पेठ, कराड) यांच्यासह दोन अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी अनंत चतुर्दशीला देवांग गणेश मंडळ आणि छत्रपती गणेश मंडळाचे कार्यकर्ते रविवार पेठेतील पाण्याच्या टाकी परिसरात आमनेसामने आले होते. दोन्ही मंडळाच्या मिरवणुका सुरू असताना क्रांतीकुमार मोरे याचा युवराज मर्ढे याला धक्का लागला आणि त्यानंतर वाद सुरू झाला होता. मात्र काही वेळातच वादावर पडदा टाकण्यात आला आणि दोन्ही मंडळाच्या विसर्जन मिरवणुका पुन्हा सुरू झाल्या होत्या. विसर्जन मिरवणुकीवेळी झालेल्या या वादानंतर रविवारी दुपारी देवांग गणेश मंडळ परिसरात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. हा वाद कायमचा मिटवण्यासाठी दोन्ही मंडळातील पदाधिकारी उपस्थित राहिले होते. बैठकीत चर्चा सुरू असतानाच चर्चेसाठी उपस्थित असणार्या एकाने वीट फेकून मारली आणि सुदैवाने ही वीट भिंतीवर आपटल्याने अनर्थ टळला. मात्र त्यानंतर पुन्हा वादाला सुरुवात झाली. या वादावेळी दोन्ही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परस्परांना मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.