सातारा : सातारा-लोणंद राज्यमार्गाच्या रुंदीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू असल्याचे चित्र असले, तरी या कामाच्या गुणवत्तेचा मात्र बोजवारा उडाल्याचा गंभीर आरोप होत आहे. कोरेगाव तालुक्यातील आंबवडे गावच्या हद्दीत करण्यात आलेल्या डीबीएम (डेंस बिट्युमिनस मॅकॅडम) थराच्या कामात अनेक त्रुटी आढळून आल्याने रस्त्याच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लाखो-कोट्यवधी रुपये खर्चून उभारला जाणारा हा रस्ता काही दिवसांतच खड्ड्यांच्या खाईत जाणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
आंबवडे हद्दीत डीबीएमचा थर टाकताना आवश्यक प्रमाणात प्राइम कोट आणि टॅक कोटचा वापर करण्यात आला नसल्याचा आरोप आहे. त्यामुळे नवीन डांबरी थर खालच्या पृष्ठभागाला अपेक्षित पद्धतीने चिकटलेला नसल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर डीबीएमचा थर टाकण्यापूर्वी रस्त्याचा पृष्ठभाग व्यवस्थित साफ करण्यात आला नसल्याचेही निदर्शनास आले आहे. लूज मटेरियल आणि डांबराचे प्रमाणही निर्धारित निकषांनुसार नसल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
रस्त्याच्या कामात मूलभूत तांत्रिक निकषांचे पालन झाले नाही, तर त्याचा थेट परिणाम रस्त्याच्या टिकाऊपणावर होणार आहे. पावसाळ्यात पाणी झिरपणे, डांबरी थर उखडणे आणि ठिकठिकाणी खड्डे पडणे अशा समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या सुरु असलेल्या कामाची गुणवत्ता तपासण्याची गरज निर्माण झाली आहे. रस्ता बांधणीच्या नावाखाली जनतेच्या पैशांची उधळपट्टी होणार असेल, तर ती सहन केली जाणार नाही. रस्ता पूर्ण झाल्यानंतर खड्डे बुजवण्यापेक्षा आत्ताच कामाचा दर्जा तपासा आणि दोषींवर कारवाई करा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
जनतेच्या पैशातून उभारल्या जाणाऱ्या या महामार्गाच्या कामात गुणवत्तेशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही. आंबवडे हद्दीतील डीबीएमच्या कामासह संपूर्ण रस्त्याच्या कामाचे स्वतंत्र थर्ड पार्टी ऑडिट करावे, अशी मागणी एनएचएआयचे वरिष्ठ अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली असून दोषी आढळणाऱ्या संबंधित कंत्राटदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.- ॲड. वैभव मोरे, मल्हार फांऊडेशन