वाई : सुरूर ते पोलादपूर या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. मात्र, या कामात ठेकेदाराने मनमानी करत जुन्या व देशी झाडांवर कुर्हाड चालवली आहे. या कामात आणखी झाडांची कत्तल केली जाणार आहे. याविरोधात पर्यावरणप्रेमी एकवटले असून संबंधित ठेकेदाराविरोधात वाई पोलिसांकडे तक्रार करून ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
कामात सुरू असलेल्या भानगडींबाबत जनआंदोलन उभे राहत असून हे काम बंद पाडण्याचा इशाराही त्रस्त जनतेने दिला आहे. सुरुर-पोलादपूर रस्त्याच्या भानगडींबाबत सर्वसामान्य जनतेच्या तक्रारींची दखल घेत ‘पुढारी’ने मोहीम उघडली आहे. सध्या सुरूर, वाई, पाचगणी, महाबळेश्वर, प्रतापगड ते पोलादपूर या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. या रस्ते कामात आवश्यक भासल्यासच झाडे तोडण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
मात्र, संबंधित ठेकेदाराने मनमानी करत सर्रास सर्वच झाडे तोडण्याचा सपाटा सुरू केला आहे. यामुळे हा रस्ता बोडका झाला असून पर्यावरणप्रेमी याविरोधात आक्रमक झाले आहेत. या रस्त्याचे काम सुरू झाल्यामुळे नागरिकांना आता त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून वाई शहरासह तालुक्यात अवकाळी पावसाने दणका दिला आहे. प्रचंड पाऊस झाल्याने रस्त्यावर मातीचा चिखल झाला असून झालेल्या राड्यारोडामुळे वाहन चालकांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाच्या गलथान कारभारामुळे कोणत्याही उपाय योजना करण्यात आलेल्या नाहीत. सुरूरहून वाईकडे जाणार्या रस्त्यावर वाठार क्रॉसिंगजवळ गार्ड ठेवण्यात येणार होता. येथे फ्लेक्स लावण्यात येणे आवश्यक असताना काहीच करण्यात आले नाही. त्यामुळे पाचगणी-महाबळेश्वरला येणार्या पर्यटकांची दिशाभूल होत असून अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या रस्त्यासाठी चुकीच्या पद्धतीने झाडांची कत्तल झाल्याने पर्यावरणप्रेमी आक्रमक झाले आहेत. त्यांनी कंपनीवर कारवाई व्हावी, यासाठी वाई पोलिसांकडे तक्रार करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
या कामामुळे पर्यावरणाची मोठी हानी होणार असल्याने हे काम बंद पाडण्याचा इशारा दिला आहे. शेकडो झाडे ठेकेदाराच्या रडारवर आहेत. प्रांत, वनविभाग यांच्यासह वाईतील अनेक संघटनांनी प्रखर विरोध करूनही झाडे तोडण्याचा काही सपाटा संपलेला नाही. सुरूर- वाई या 9 किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर ठेकेदाराने सहा ते सात ठिकाणी रस्त्याचे काम सुरु केले आहेत. त्यामुळे एकही बाजू वाहन चालवण्यासाठी सुरक्षित नाही. एका बाजूला सहा ते सात फुट उंचीची खाच तयार केल्याने दुसर्या बाजूने जाणार्या मालाने भरलेली वाहने असल्याने दुचाकी व हलक्या वाहनचालकांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. चिखलाने आणखी परिस्थिती गंभीर झाली आहे. अनेक कंपन्यांच्या दारातच मातीचे ढिगारे लावल्याने साधी चालताही येत नसल्याची परिस्थिती ओढावली आहे. या भोंगळ कारभाराचा व्यावसायिकांनाही फटका बसला आहे.
सुमारे 300 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. निवडणुकीपूर्वी हे काम फायनल करून बॅगा पोहोचवल्या गेल्या. या प्रक्रियेत कोण कोण होते? हे टेंडर ज्यांना मिळाले ते तापडिया या रस्त्याचे काम करत आहेत का? त्यांनी कुणाला हे काम सबलिड केले? त्यात काय वाटाघाटी झाल्या? याची खमंग चर्चा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळात सुरु आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यांतर्गत येणारा हा कारभार जोरदार चव्हाट्यावर आला आहे.