College Admissions | पाल्याच्या प्रवेशासाठी पालकांची प्रतिष्ठा पणाला Pudhari File Photo
सातारा

College Admissions | पाल्याच्या प्रवेशासाठी पालकांची प्रतिष्ठा पणाला

अकरावीसह व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी ठराविक महाविद्यालयांकडेच कल

पुढारी वृत्तसेवा
मीना शिंदे

सातारा : सध्या अकरावीसह उच्च शिक्षणाच्या विविध अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू झाले आहेत. ठराविक महाविद्यालयांसाठी आग्रह धरला जात आहे. स्पर्धेचे युग असल्याने प्रवेश प्रक्रियेतही चुरस वाढली आहे.

अशात चांगल्या कॉलेजला पाल्याला प्रवेश मिळण्यासाठी पालकांची प्रतिष्ठा पणाला लागत आहे. आमदार, खासदारांसह मान्यवरांच्या शिफारशी पत्रांमुळे शाळा-महाविद्यालयेही अडचणीत येत आहेत. सध्या अकरावीसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. अकरावी प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, कॅपराऊंडमधील प्रवेश निश्चिती केली जात आहे. तर इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश नोंदणी सुेरू आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांची धांदल उडाली आहे.

सातारा जिल्ह्याचा दहावी निकाल 96.75 टक्के लागला असून, 36 हजार 218 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील अकरावी प्रवेश क्षमता 55 हजार असून, अकरावी समकक्ष अभ्यासक्रम वगळता अकरावी प्रवेशासाठी कला शाखेच्या 148 महाविद्यालयात 16 हजार 110 प्रवेश क्षमता आहे. वाणिज्य शाखेच्या 132 महाविद्यालयात 11 हजार 890 विज्ञान शाखेच्या 160 महाविद्यालयात 21 हजार 80 प्रवेश क्षमता आहे.

तसेच जिल्ह्यात 11 शासकीय व 7 खाजगी आयटीआयमध्ये सुमारे 5 हजार 400 प्रवेश क्षमता आहे. या सर्व प्रवेशक्षमता पूर्णतेसाठी पारदर्शकता व सुलभतेच्या कारणास्तव यावर्षी अकरावीची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबवण्यात येत आहे. परंतु, दरवर्षीप्रमाणे ठराविकच महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थी व पालकांमधून आग्रह धरला जात असल्याने काही महाविद्यालयांमध्ये विनाअनुदानित तुकड्यांमध्येही प्रवेश पूर्ण होत आहेत, तर काही महाविद्यालयांच्या अनुदानित तुकड्यांना विद्यार्थ्यांची प्रतीक्षा कायम आहे.

स्वत:च्या अपेक्षा, स्वप्नं मुलांच्या माध्यमातून सत्यात उतरवण्याची मानसिकता पालकवर्गात वाढली आहे. त्यामुळेच पाल्याचे करिअर हा पालकांच्या प्रतिष्ठेचा विषय ठरला आहे. त्यामुळे त्याला नामांकित महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी पालकांची प्रतिष्ठा पणाला लावली जात आहे. त्यासाठी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या शिफारशींचा वापर केला जात आहे. तर कधी डोनेशन भरुन मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश मिळवला जात आहे. मात्र या मानसिकतेचा फटका अनेक अनुदानित शाळा-महाविद्यालांना बसत असून विद्यार्थ्यांविना ती बंद करावी लागत आहेत. तसेच खाजगी शिक्षण संस्थांची संख्या वाढत आहे. पालकांनी पाल्याची गुणवत्ता, आवड अन् कुवत पाहून त्याच्या आवडीच्या क्षेत्रातील करिअरची ओरिएंटेड शिक्षणशाखा निवडीचे स्वातंत्र्य व संधी देण्याची गरज आहे.

वशिलेबाजीला खतपाणी...

लोकप्रतिनिधी, आमदार, खासदारांच्या शिफारसपत्रांचा वापर केला जात आहे. शिक्षण संस्थाचालकांवर दबाव वाढत आहे. ओळखीचा वापर करून प्रवेश मिळवला जात आहे. या प्रयत्नांमुळे एकीकडे वशिलेबाजीला खतपाणीच घातले जात आहे, तर दुसरीकडे नामांकित शिक्षण संस्थांमध्ये विनाअनुदानित तुकड्यांची संख्या वाढत आहे. अनुदानित तुकड्यांमध्ये गुणवत्तेनुसार प्रवेश क्षमता पूर्ण होत असल्याने केवळ विद्यार्थी व पालकांच्या हट्टामुळे बारावीपर्यंत मोफत शिक्षण असतानाही फी भरुन विनाअनुदानितला प्रवेश घेतला जात आहे.

अनेक प्रतिस्पर्धी असल्यास चुरशीने अभ्यास वाढतो. ग्रामीण भागातील हुशार समजले जाणारे विद्यार्थी शहरातील महाविद्यालयांमध्ये फी भरून शिकत आहेत. परिणामी, गाव परिसरातील महाविद्यालयात प्रवेश घेतला तर पाल्याला स्पर्धक उरत नाही. त्यामुळे तो अभ्यासात मागे राहिल अशी धास्ती राहते.
- नीलेश साबळे, पालक, शिवथर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT