सातारा : तासवडे, ता. कराड एमआयडीसीत खते बनवण्याचा कारखाना सुरु असल्याचा बहाणा करणार्या सुर्यप्रभा फॉर्माकेम कंपनीतून तळबीड पोलिसांनी 1 किलो 270 ग्रॅम वजानाचे 6 कोटी 35 लाखांचे कोकेन जप्त केले. या प्रकरणी पाच संशयीतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमरसिंह जयवंत देशमुख (रा. नांदगाव), समीर सुधाकर पडवळ (रा. वृंदावन सिटी मलकापूर कराड), रमेश शंकर पाटील (रा. मल्हारपेठ ता. पाटण), जीवन चंद्रकांत चव्हाण (रा. आवर्डे ता. पाटण), विश्वनाथ शिपणकर (रा. दौंड जि.पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गुरुवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली असली तरी याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. शुक्रवारी संशयीतांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यातील अमरसिंह देशमुख हा मुख्य संशयित असून तो कंपनीचा मालक आहे. त्याला तेलंगणा राज्यातील श्रीरामपूर पोलिसांनी अंमली पदार्थ प्रकरणी यापूर्वीच अटक केली आहे. तर विश्वनाथ शिपणकर हा पसार झाला आहे.
तासवडे येथील कारवाईबाबतची माहिती देताना नूतन पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी सांगितले, की तळबीड पोलीस ठाण्याचे एक पथक तासवडे एमआयडीसमध्ये पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी त्यांना प्लॉट नंबर बी. 56 येथील सूर्यप्रभा कंपनीत सुरक्षितता व नियमावलीनुसार कामकाज होत नसल्याबाबत माहीती मिळाली. त्यामुळे सपोनि किरण भोसले यांनी पथकासह या सूर्यप्रभा कंपनीत पाहणी केली. त्यावेळी तेथे शेतीसाठी लागणारे औषधे तयार केली जातात असे सांगितले. मात्र तेथे काही संशयित पदार्थ आढळल्याने पोलिसांनी त्याचा पंचनामा केला. नंतर कंपनीतील कर्मचार्यांनी ते फिनिक्स ऍसिटिक ऍसिड असल्याचे सांगितले. पोलिसांनी कपाटातील प्लास्टिकच्या चार पिशव्यांमध्ये स्फटिकासारखा पदार्थ आढळला. या पदार्थासंदर्भात पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली. मात्र प्राथमिक तपासात हा पदार्थ म्हणजे कोकेन असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याचे वजन 1370 ग्रॅम असून किंमत 6 कोटी 35 लाख असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ.वैशाली कडूकर, डीवायएसपी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि किरण भोसले, अमित बाबर, फौजदार साक्षात्कार पाटील, सतिश आंदेलवार, काळे, पोलिस शशिकांत खराडे, शहाजी पाटील, योगेश भोसले, आनंदा रजपूत, गोरखनाथ साळुंखे, निलेश विभुते, अभय मोरे यांनी केली.
तासवडे एमआयडीसी येथील कोकेन प्रकरणात मुख्य संशयित आरोपी अमरसिंह देशमुख याचा लवकरच तेलंगणा पोलिसांकडून ताबा घेण्यात येणार आहे. त्याला अटक केल्यानंतर चौकशी दरम्यान या गुन्ह्याच्या तपासाला अधिक बळकटी येणार आहे. पोलिसांनी ड्रग्ज जप्त केले असून त्याचे सॅम्पल फॉरेन्सिक लॅबकडे पाठवले आहेत.तुषार दोशी, पोलिस अधीक्षक, सातारा