तासवडे टोलनाका : तासवडे (ता. कराड) येथील एमआयडीसीत गुरवारी कराडचे पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर आणि तळबीड पोलिस ठाण्याचे स.पो.नि. किरण भोसले यांच्या पथकाने साडेसहा कोटी रुपये किमतीचे कोकेन जप्त केले. दरम्यान, हे कोकेन देशभरात कुठे कुठे विक्रीसाठी गेले आहे याचा शोध पोलिस घेत आहेत. यासाठी विविध ठिकाणी पथके रवाना झाली आहेत.
जिल्हा पोलिस प्रमुख तुषार दोशी यांच्या सूचनेनुसार उपअधीक्षक अमोल ठाकूर व स.पो.नि. किरण भोसले याच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची पथके देशभरात रवाना झाली आहेत. तासवडे एमआयडीसीमध्ये चार वर्षांपूर्वी अमरसिंह जयवंत देशमुख आणि विश्वनाथ शिफनकर याच्यासह समीर सुधाकर पडवळ, रमेश शंकर पाटील,जीवन चंद्रकांत चव्हाण यांनी डोंगराच्या बाजूला खत बनवण्यासाठी कंपनी सुरू केली होती. चार वर्षोपासून या कंपनीत खत बनवण्याच्या नावाखाली कोकेनचे उत्पादन घेतले जात असल्याचा धकादायक प्रकार उघडकीस आला आहे.
कंपनीचा म्होरक्या अमरसिंह देशमुख आणि दौंड तेथील विश्वनाथ शिफनकर या दोघांनी प्लॅनिंग करत कोकेन बनवण्याचा उद्योग सुरू केला होता. कोकेन बनवल्यानंतर अतिशय गुप्तता पाळत तेलंगाना,तामिळनाडू,गोवा, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक ,उत्तर प्रदेश यासह संपूर्ण देशात जात होते. दरम्यान कोकेन व्यापाराची व्याप्ती खूप मोठी असल्यामुळे सातारा पोलिसांनी कोकेन व्यापाराची पाळीमुळे शोधण्यासाठी कंबर कसली आहे. युवा पिढीला उद्ध्वस्त करणार्या कोकेनचे रॅकेट नेस्तनाबूत करण्यासाठी सातारा पोलिसांनी विविध पथके तयार केली आहेत.
तासवडे एमआयडीसीत तळबीड पोलिसांनी तब्बल साडेसहा कोटींचे कोकेन जप्त केले. त्यावेळी अन्न भेसळ विभागाचे काही अधिकारी उपस्थित होते. त्यांनी दीर्घ तपास करून ते कोकेन असल्याचे सांगितले; परंतु हेच कोकेन गेल्या चार वर्षांपासून तासवडे एमआयडीसीत तयार होत होते. तरीही अन्नभेसळ विभागाला याबाबत समजले नाही याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. चार वर्षे अन्न भेसळ नागरी विभाग नक्की काय करत होता, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.