Devendra Fadnavis file photo
सातारा

Devendra Fadnavis | अलर्ट राहून आवश्यक उपाययोजना करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सूचना

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी. प्रशासनाने २४ बाय ७ तास अलर्ट राहून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी होत आहे, जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे राज्यातील पुरपरिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी सातारा जिल्ह्यातील परिस्थितीची जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडून माहिती घेतली.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सातार्‍यासह पश्‍चिम घाट भागात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे. राज्यात विविध ठिकाणी ८ जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. सातारा जिल्ह्यातही प्रशासनाने दक्ष राहून आवश्यक त्या उपाययोजना तात्काळ कराव्यात. नागरिक आणि पर्यटकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवावी, असे आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी केले.

यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सातारा जिल्ह्यातील अतिवृष्टीविषयक माहिती दिली. जिल्ह्यात जून ते आजअखेर २४२ मि.मी. पाऊस झाला. ६ जुलै रोजी जिल्ह्यात एकूण २१ महसूल मंडळांमध्ये ६५ मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाल्याचे त्यांनी सांगितले. सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर, पाटण, सातारा, वाई पर्यटनस्थळे असून अनेक ठिकाणी छोट्याशा पावसानेही चिखल होऊन तेथील भाग निसरडा होतो. पर्यटकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने या काळात पर्यटन स्थळावर जाण्यासाठी पर्यटकांना तात्पुरती बंदी घालण्यात येणार आहे.

भूस्खलन प्रवण क्षेत्रातील नागरिकांच्या सुरक्षेतेच्या दृष्टीने स्थलांतरासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत, असेही जिल्‍हाधिकारी पाटील यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT