मॉक पार्लमेंटच्या शुभारंभप्रसंगी आ. चित्रा वाघ, समवेत आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, उत्तरा भोसले व भाजपाच्या पदाधिकारी. Pudhari Photo
सातारा

Chitra Wagh | काँग्रेसने संविधानाचा गळा घोटला : आ. चित्रा वाघ यांची घणाघाती टीका

कृष्णा हॉस्पिटल कॅम्पसमध्ये राज्यस्तरीय मॉक पार्लमेंट

पुढारी वृत्तसेवा

कराड : काँग्रेसने लोकसभा निवडणुकीवेळी भाजपा संविधान बदलणार असल्याचा खोटा प्रचार केला. मात्र त्याच काँग्रेसने 50 वर्षांपूर्वी आणीबाणी लागू करत लोकशाही हत्या केली होती. भाजपावर संविधान बदलण्याचा घाट घातल्याचा आरोप करणार्‍या काँग्रेसने संविधानाचा गळा घोटल्याची घणाघाती टीका भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा आ. चित्रा वाघ यांनी केली आहे.

सन 1975 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती. या घटनेला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपा महिला मोर्चाकडून मलकापूर (कराड) येथील कृष्णा विश्व विद्यापीठाच्या कॅम्पसमधील मॉक पार्लमेंटच्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, सौ. उत्तरा भोसले यांच्यासह राज्यभरातील महिला मोर्चाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.

आ. चित्रा वाघ म्हणाल्या, काँग्रेसच्या काही लोकांचे आपणास हसू येते. लोकसभा निवडणुकीवेळी खोटा प्रचार करत जनतेची दिशाभूल करणार्‍या काँग्रेसने 50 वर्षापूर्वी आणीबाणी लागू करत लोकशाहीची हत्या केली होती. त्यावेळी सरकारविरोधात बोलण्यास मनाई करण्यात आली होती. लोकांचे लोकशाहीने दिलेले सर्व अधिकार काढून घेत अत्याचार करण्यात आले होते. त्यामुळे या सर्व गोष्टी युवा पिढीला समजणे आवश्यक असून त्यासाठी महिला प्रदेश भाजपाकडून मॉक पार्लमेंटचे आयोजन करण्यात आले असल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले.

आमदार डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, स्वातंत्र्यानंतरच्या काही वर्षातच देशात आणीबाणी लादण्यात आली होती. त्यामुळेच भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील हा काळा दिवस मानला जातो. महिला भाजपाकडून राज्यभरात आणीबाणीसह काँग्रेसकडून संविधानाची झालेली मोडतोड आणि सर्वसामान्यांच्या अधिकारावर आणलेली गदा याबाबत जनजागृती केली जात आहे. हे खूप महत्त्वाचे असून आम्ही कॉलेजला नव्हतो अथवा विधानसभेत नव्हतो त्यावेळी असे कार्यक्रम होत नव्हते याची खंत आमदार अतुलबाबांनी व्यक्त केली. मात्र आता चित्रा वाघ प्रदेशाध्यक्ष असल्याने असे कार्यक्रम होत असल्याबाबत आमदार अतुलबाबांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान, मॉक पार्लमेंट दिेवसभर सुरू होती आणि यामध्ये राज्यभरातील महिला पदाधिकारी सहभागी होत्या.

लक्षवेधी वेशभूषा अन् आणीबाणीवर चर्चा...

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, शशी थरूर यासह विविध खासदारांच्या आकर्षक वेशभूषा करत भाजपाच्या महिला पदाधिकारी मॉक पार्लमेंटमध्ये सहभागी झाल्या होत्या. संसदेच्या कामकाजाप्रमाणे कामकाज करत खासदार बनलेल्या महिलांनी आणीबाणी कशी चुकीची होती ? लोकशाहीची कशाप्रकारे हत्या करण्यात आली? हे मांडले. तर विरोधी पक्षाच्या खासदारांची भूमिका करणार्‍या महिला पदाधिकार्‍यांनी आणीबाणीचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला. या चर्चेसह मॉक पार्लमेंटमध्ये कंगणा राणावत यांच्यासह काही खासदारांच्या वेशभूषा केलेल्या महिला पदाधिकारी लक्ष वेधून घेत होत्या.

नुसतं नाव असून चालत नाही....

आ. चित्रा वाघ यांनी विधानसभेतील डॉ. अतुलबाबा यांच्या विजयाचे कौतुक करताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर अप्रत्यक्षपणे टीका केली. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात भाजपाचा उमेदवार विजयी होऊ शकते हे स्वप्नातही पटत नसेल. पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव करणे सोपे काम नव्हते. एक लोकप्रतिनिधी म्हणून डॉ. अतुलबाबा चांगले काम करत आहेत. आमदार नसतानाही डॉ. सुरेश भोसले यांच्यासह संपूर्ण कुटूंबियांचे काम आदर्शवत असेच होते. केवळ नाव असून चालत नाही, तर लोकांशी संवाद साधत घराघरात जाणे महत्त्वाचे असल्याचे आमदार अतुलबाबांनी दाखवून दिले असल्याचे आ. चित्रा वाघ यांनी यावेळी बोलून दाखविले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT