नक्षलवाद्यांशी लढताना सातारा येथील जवान शहीद file photo
सातारा

Satara News | नक्षलवाद्यांशी लढताना सातारा येथील जवान शहीद

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी पेरलेल्या भूसुरुंगाचा स्फोट

पुढारी वृत्तसेवा

खंडाळा : छत्तीसगड येथे नक्षलवादी चकमकीत खंडाळा तालुक्यातील बावडा येथील जवान अमर शामराव पवार (वय 36) हे शहीद झाले असून तालुक्यावर शोककळा पसरली आहे. त्यांचे पार्थिव रविवारी येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

तालुक्यातील बावडा येथील शेतकरी कुटुंबातील अमर पवार हे छत्तीसगडमधील नारायणपूर कॅम्पमध्ये कार्यरत होते. शनिवारी नक्षलवाद्यांनी पेरलेल्या भूसुरुंगाचा स्फोट झाला. त्यामध्ये चार जवान जखमी झाले होते. यामधील दोघेजण गंभीर होते. त्यामध्ये बावड्यातील अमर पवार यांचा समावेश होता. जखमी जवानांना सैन्य दलाने कस्तुरमेटा कॅम्पमधून हेलिकॉप्टरच्या सहाय्याने रायपूर येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र येथे उपचारादरम्यान अमर पवार यांना वीरमरण आले. त्याची माहिती खंडाळा तालुक्यात समजतात संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, सात वर्षाचा मुलगा, भाऊ, भाऊजी असा परिवार आहे.

मनमिळावू अमर यांच्या जाण्याने तालुका हेलावला

अमर पवार हे मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांचा मित्र परिवारही मोठा होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण बावडा येथे झाले. ते 2010 मध्ये सैन्य दलात आयटीबीपीमध्ये भरती झाले होते. सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेणारे अमर सर्वांचे लाडके होते. ते शहीद झाल्याचे वृत्त कळताच बावडा गावासह संपूर्ण परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळला असून अवघा तालुका हेलावून गेला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT