Vishwas Patil | बदलत्या निवडणूक पध्दतीमुळे लोकशाहीला धोका : विश्वास पाटील Pudhari
सातारा

Vishwas Patil | बदलत्या निवडणूक पध्दतीमुळे लोकशाहीला धोका : विश्वास पाटील

भूषण गवई यांना स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार

पुढारी वृत्तसेवा

उंडाळे : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व थोर हुतात्म्यांनी भारतीय लोकशाही निकोप व्हावी म्हणून निवडणूक पध्दत दिली. मात्र सध्या भारताच्या आजूबाजूच्या शत्रूंकडून भारतीय लोकशाहीला धोका पोहचणार नाही पण निवडणुकीच्या बदलत्या चाली आणि रितीमुळे लोकशाहीला धोका निर्माण होईल की काय, अशी भीती अ.भा.साहित्य साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व पानिपतकार विश्वास पाटील यांनी व्यक्त केली.

उंडाळे ता.कराड येथे स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर स्मारक समितीच्या वतीने स्वा. दादासाहेब उंडाळकर यांच्या 52 व्या स्मृतिदिनानिमित्त देण्यात येणारा यावर्षीचा स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई यांना विश्वास पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमास केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण अध्यक्ष व मेघालय हायकोर्टाचे सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती रणजीत मोरे, मुंबई हायकोर्टाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती प्रदीप देशमुख, स्वा.दादा उंडाळकर स्मारक समितीचे विश्वस्त व रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ॲड. उदयसिंह पाटील -उंडाळकर, ॲड.विजयराव पाटील, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.

विश्वास पाटील म्हणाले, स्वातंत्र्यांची लढाई या विभागात अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी अत्यंत धडाडीने लढली. स्व. वसंतदादा, स्व. यशवंतराव चव्हाण, कॉम्रेड शेख काका, पांडुरंग बर्डे गुरुजी, जी.डी.लाड, दादा उंडाळकर यासह अनेक नावे घेता येतील असे स्वातंत्र्यसैनिक येथे होऊन गेले. याच काळात जिल्ह्यातील टिळक हायस्कूल कराड, द्रविड हायस्कूल वाई यासह किती तरी विद्यालयातील विद्यार्थीही स्वातंत्र्याच्या लढ्याने भारावले होते. त्यांच्या त्यागातून हे स्वातंत्र्य उभे राहिले हा इतिहास आहे.

स्वातंत्र्या पूर्वी सातारा येथे प्रति सरकार स्थापन करण्यात आले होते. या प्रति सरकाराची दहशत इंग्रजांना होती. इंग्रज सरकारच्या राजवटीत या प्रती सरकाराने जिल्ह्यातील अनेक खटले निकाली काढले. पण आजच्या न्यायव्यवस्थेतील खटले किती वेळाने निकाली निघतात याचाही अभ्यास करणे गरजेचे आहे. अशी टिप्पणी करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत न्याय, हक्क,तत्वे, दिली. जातीपातीच्या राजकारणाला थरा दिला नाही, पण आजही तुझा धर्म कोणता, तुझी जात कोणती विचारले जाते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जात, धर्म या पलिकडे जाऊन माणुसकी हा धर्म पाळला. लोकशाही निकोप राहावी यासाठी स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, संविधान या सर्व गोष्टीचा पुरस्कार केला.

लोकशाही निकोप राहावी यासाठी निवडणुकांचा मार्ग याच घटनेतून तयार केला, पण आज निवडणूक आली की पोटात गोळा येतो. भारतीय निवडणूक आज ज्या पद्धतीने सुरू आहे ती पद्धत पहाता परकीय शक्तीपेक्षा भारतीय निवडणूक लोकशाहीला घातक आहे, अशी भीतीही त्यांनी व्यक्त करून जेवढी भीती परकीय देशापासून नाही ती आता निवडणुकीपासून वाटते. आज एक हजार दोन हजार रुपयासाठी मतांचा बाजार मांडला जातो ही शोकांतिका आहे.

प्रारंभी स्वा. दादा उंडाळकर स्मारक समितीचे विश्वस्त आणि रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ॲड. उदयसिंह पाटील -उंडाळकर म्हणाले, 43 वर्षांपासून उंडाळे सारख्या ग्रामीण भागात माजी मंत्री स्व.विलासराव पाटील उंडाळकर यांनी सामाजिक, वैचारिक यज्ञकुंड सुरू केला. ही त्यांची परंपरा स्मारक समितीने आजही पुढे सुरू ठेवली आहे. लोकशाही बळकटी करण्यासाठी आणि नव्या पिढीला स्वातंत्र्याचा इतिहास समजावा म्हणून आम्ही हे काम अव्याहतपणे सुरू ठेवले आहे. भूषण गवई यांनी समाजासाठी दिलेले योगदान व सामाजिक न्याय क्षेत्रात केलेले काम उल्लेखनिय आहे. स्मारक समितीचे विश्वस्त विजय पाटील -उंडाळकर यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली.

यावेळी स्मारक समितीच्या वतीने देण्यात येणाऱ्या मानपत्राचे वाचन स्मारक समितीचे विश्वस्त माजी प्राचार्य गणपतराव कणसे यांनी केले. कार्यक्रमास कोयना सहकारी दूध संघाचे चेअरमन लक्ष्मण देसाई, व्हाईस चेअरमन शिवाजीराव जाधव, कराड तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन अनिल मोहिते,व्हाईस चेअरमन जगन्नाथ मोरे, कराड तालुका बाजार समितीचे सभापती सतीश इंगवले, उपसभापती नितीन ढापरे, कराड तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन रंगराव थोरात, निवासराव निकम, रफिक बागवान सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध बार असोसिएशन व वकील संघटनांचे पदाधिकारी, वकील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कराड तालुका बार असोसिएशन यांच्यावतीने ॲड. दीपक थोरात यांनी भूषण गवई यांचा सत्कार केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT