सातारा : सातार्यात चोरट्यांनी खुलेआम धिंगाणा घातला असून ‘चेन स्नॅचर्सचा नारा... चलो सातारा’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोयते दाखवून लुटमार होत असल्याने सातारकरांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. यामुळे प्रभावी पोलिसिंग होऊन सक्रिय झालेल्या कोयता गँगचा बिमोड करण्याचे आव्हान सातारा पोलिस दल कधी पेलणार? असा संतप्त सवाल उपस्थित झाला आहे.
सातारा शहरात चेन स्नॅचिंगच्या घटना वाढल्या असून भरीस भर म्हणून कोयत्याचा थेट धाक दाखवला जात असल्याने महिला वर्ग भेदरून गेला आहे. चार दिवसांत दोन घटना घडल्या नंतरही पोलिसांकडून खबरदारी घेतली न गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. गेल्या काही वर्षांपासून चेन स्नॅचर्सवर वचक राहिला होता. मात्र पुन्हा त्यांनी डोके वर काढले आहे. यामुळे पोलिसांना सर्व ठिकाणी पहारा देऊन कोयता गँगचे कंबरडे मोडावे लागणार आहे. सध्या सणासुदीचा माहोल असताना एका मागून एक कोयते दाखवून चोर्या होत असल्याने चिंतेची बाब निर्माण झाली आहे.
सातारा शहरात गेल्या 1 महिन्यामध्ये नागरिकांनी स्वतःहून चेन स्नॅचिंग करणार्या व घरफोडी करणार्यांना पकडले आहे. चोरट्यांनी नागरिकांवर हल्ला केल्यानंतर चोरट्यांना प्रतिकार करत नागरिकांनी त्यांना धोपाट्या घातल्या आहेत. आता तर कोयते दाखवून लुटमार होत असेल तर याच सातारकर नागरिकांनी कायदा हातात घ्यावा का? असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
सातारा शहरात सीसीटीव्हीची मोठी वानवा आहे. जे सीसीटीव्ही आहेत ते सुमार व दर्जाहीन आहेत. दै. ‘पुढारी’ने याबाबत सातत्याने आवाज उठवून सातार्यात चांगल्या दर्जाचे सीसीटीव्ही बसवावेत, असे लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. दुर्दैवाने मात्र याकडे कानाडोळा होत आहे. यातूनच चोरटे, कोयता गँगवाले, चेन स्नॅचरना आयते कोलीत मिळत आहे
सातार्यात गेल्या 12 वर्षांपूर्वी आठवड्यातून 2, 3 स्नॅचिंग व हमखास घरफोड्यांचे सत्र व्हायचे. नवे एसपी, पोलिस निरीक्षक यायचे आणि जायचे पण स्नॅचिंग व घरफोड्या जैसे थे असायच्या. तत्कालीन पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी कार्यभार घेतल्यावर शहराचा अभ्यास करून त्यांनीच प्रथम पीसीआर व बीट मार्शल संकल्पना सुरू केली. याचा परिणाम असा झाला की रस्त्यावर पोलिस दिसू लागले. यामुळे तेव्हापासून अशा घटनांवर पायबंद बसला. यामुळे एसपी डॉ. अभिनव देशमुख मॉडेल सातार्यात पुन्हा सुरू करण्याची वेळ आली आहे.
कोयता गँगला ठेचा...
सातार्यात गेल्या वर्षापूर्वी कोयता गँग नव्याने उदयास आली होती. एकमेकांविषयी ईर्षा, दादागिरी वाढण्यासाठी थेट कोयते काढून हल्ले -प्रतिहल्ले केले जात होते. घे कोयता.. हान डोक्यात’ असा ट्रेंड सुरू होऊन याचा फटका अनेकांना बसला आहे. चेन स्नॅचिंग करणारे कोयते नाचवत नव्हते. आता मात्र असा नवा ट्रेंड सुरू झाल्याने जे कोणी असेल त्यांना ठेचले जावे, अशी मागणी होत आहे.
पीसीआर, बीट मार्शल करतंय काय?
सातारा शहर लहान असून देखील रस्त्यावर पोलिसांचा प्रेझेन्सच नसतो. यासाठी पीसीआर व्हॅन व बीट मार्शल तैनात असतात मात्र ते काय करतात? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सध्या तर गणेश उत्सवामुळे अतिरिक्त पोलिस बंदोबस्त, वेगवेगळ्या पोलिसांच्या तुकड्या सातार्यात दाखल झाल्या आहेत. मग हे सगळे पोलिस काय करतात, याची झाडाझडती पोलिस अधीक्षक यांनी घ्यावी.