लोणंद : फलटण तालुक्यातील काळज गावच्या हद्दीत दगड फोडण्याचे काम सुरू असताना केबिनवर दगड कोसळून झालेल्या गंभीर अपघातात पोकलेन ऑपरेटर ठार झाल्याची घटना घडली आहे. या घटेनची नोंद लोणंद पोलिस ठाण्यात झाली आहे.
महेश प्रसाद रूपलाल महतो (वय 20, मूळ रा. झारखंड, सध्या काळज, ता. फलटण) असे ठार झालेल्या ऑपरेटरचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, काळज, ता. फलटण येथील गट क्रमांक 313 मध्ये दगड फोडण्याचे काम सुरू होते. दुपारी काही काळ हे थांबवण्यात आले. यावेळी महेश महतो हा पोकलॅनच्या केबिनमध्येच बसला होता. यावेळी अचानक खाणकाम सुरू असलेल्या ठिकाणचा भला मोठा दगड पोकलॅनच्या केबिनवर दगड कोसळला. अचानक घडलेल्या घटनेमुळे सर्वच जण घाबरून गेले. या घटनेत महेश महतो हा युवक जागीच ठार झाला.