सातारा: स्त्रीशक्तीच्या सन्मानाचा दिवस म्हणून दि. 8 मार्च सर्वत्र साजरा होत आहे. त्यामुळे सर्वत्रच नारीशक्तीचा जागर केला जाणार असून त्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वृक्षारोपण, रक्तदानासह विधायक उपक्रमही राबवले जाणार आहेत. त्यामुळे शहरासह जिल्ह्यात कुठे गौरव तर कुठे आपुलकीचा सोहळा रंगणार असून त्याची तयारी देखील युध्दपातळीवर सुरु आहे.
अलीकडे सर्वच विशेष दिवसांचे सेलिब्रेशन केले जात असल्याने जागतिक महिला दिनही मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. त्यामुळे महिला दिनानिमित्त स्त्रीशक्तीचा जागर होणार आहे. शासकीय कार्यालयांमध्ये महिला अधिकारी, कर्मचारी कार्यरत असल्याने शासनस्तरावर महिला सन्मानाचे नियोजन करण्यात आले आहे. सामाजिक स्तरावरही सामाजिक संस्था, संघटनांच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शाळा- महाविद्यालयांमध्येदेखील व्याख्याने, महिला गौरव तसेच वक्तृत्व, निबंध, रांगोळी, मेहंदी आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या सन्मान सोहळ्यांना आजी -माजी विद्यार्थिनींना बोलावले जाणार असल्याने आपुलकीचे स्नेहबंध आणखी दृढ होणार आहेत.
काही सामाजिक संघटनांच्यावतीने मागील दोन दिवसांपासून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण महिला दिनाला केले जाणार आहे. प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष केलेल्या, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या महिलांच्या सन्मान सोहळ्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. जागतिक महिला दिनी नारीशक्तीचे गौरव सोहळे रंगणार आहेत.
आज स्पर्धेच्या युगात महिलांची देखील स्मार्ट वुमन बनण्यासाठी धडपड सुरु आहे. त्यामुळे तिच्या आरोग्याची हेळसांड होत असल्याने किमान महिलादिनी तरी ती आरोग्यासाठी वेळ देईल, या हिशोबाने महिला दिनानिमित्त महिला व मुलींच्या आरोग्य तपासणी शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच गर्भाशय व स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण महिलांमध्ये वाढत असल्याने जनजागृतीसाठी मार्गदर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.