दै. ‘पुढारी’ सातारा कार्यालयात श्रीगणेशाची आरती करताना श्री. छ. सौ. दमयंतीराजे भोसले, यावेळी जीवनधर चव्हाण, हरीष पाटणे, मिलिंद भेडसगावकर, पंकज चव्हाण व इतर.  Pudhari Photo
सातारा

Damyantiraje Bhosale: गणेशोत्सव साजरा करा पण डेसिबलची मर्यादा पाळा

सौ. दमयंतीराजेंचे सातारकरांना आवाहन : ‘पुढारी’च्या सातारा कार्यालयात गणरायाची आरती

पुढारी वृत्तसेवा

सातारा : विवेकाचे अधिष्ठान असलेल्या श्रीगणेशाचे आगमन झाले असल्याने सर्वत्र उत्साह व चैतन्याचे वातावरण पहायला मिळत आहे. उत्सव साजरा करत असताना सर्वांनाच आनंद मिळायला पाहिजे. मात्र, आनंद साजरा करण्याच्या पध्दतीमुळे दुसर्‍यांना त्रास होता कामा नये. सर्वांनी उत्सव आनंदाने साजरा करावा पण डेसिबलची मर्यादाही पाळावी, असे आवाहन श्री. छ. सौ. दमयंतीराजे भोसले यांनी केले.

दै.‘पुढारी’ कार्यालयामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. सौ. दमयंतीराजे भोसले यांनी गुरुवारी सकाळी दै. ‘पुढारी’ कार्यालयाला भेट देऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले तसेच आरती करून ‘पुढारी’कार पद्मश्री डॉ. ग.गो. जाधव यांना अभिवादन केले. याप्रसंगी दै. ‘पुढारी’चे विभागीय व्यवस्थापक जीवनधर चव्हाण, निवासी संपादक हरीष पाटणे, जाहिरात व्यवस्थापक मिलिंद भेडसगावकर, भाजप सांस्कृतिक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष पंकज चव्हाण व तसेच ‘पुढारी’ची टीम उपस्थित होती.

सातारा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाचे धमाकेदार वातावरण आहे. डीजेच्या आवाजाची मर्यादा वाढत असल्याने पर्यावरणप्रेमी नागरिकांनी याविरोधात आवाज उठवला होता. दै. ‘पुढारी’ नेही सर्वसामान्यांच्या आवाजाला व्यासपीठ मिळवून दिले. आवाजाच्या प्रदूषणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असतानाच दै. ‘पुढारी’च्या भूमिकेचे सौ. दमयंतीराजे भोसले यांनीही स्वागत केले.

सौ. दमयंतीराजे भोसले म्हणाल्या, गणेशोत्सवामुळे सातारा शहरात छान, उत्साही वातावरण आहे. सर्वप्रथम मी दै. ‘पुढारी’ परिवाराला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देते. श्री गणेशजी यंदा कोणता विचार घेऊन आले आहेत. भक्तांना ते काय सांगू पाहत आहेत? याचा विचार प्रत्येकाने आता करायला हवा. गणेशोत्सवामुळे एकीची भावना तयार होते. सर्व लोक गुण्यागोविंदाने हा सण साजरा करत असतात. या उत्सवाचा आनंद सर्वांनाच घेता यायला हवा, असे वातावरणही तयार करण्याची जबाबदारी प्रत्येक गणेशभक्ताची आहे. उत्सवामध्ये डीजे वाजवला जातो. या डीजेच्या गोंगाटामुळे दुसर्‍याला त्रास होत आहे का? याचा विचार प्रत्येकाने करायला हवा.

तसेच उत्सव साजरा करताना पोलिस आणि न्यायालयाने जी आवाजाची मर्यादा दिली आहे ती पाळावी. हा उत्सव एकट्या-दुकट्याचा नाही तर सर्व सातारकरांचा आहे. या उत्साहाचा आनंद सर्वांनाच मिळायला हवा. अबालवृध्दांना आवाजाच्या प्रदूषणाचा त्रास होता कामा नये. यावेळी दै. ‘पुढारी’ राबवत असलेल्या उपक्रमांचेही श्री. छ. दमयंतीराजे भोसले यांनी कौतुक केले. दै. ‘पुढारी’ने अशाच पध्दतीने सर्वसामान्यांच्या पाठिशी ठाम उभे राहावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

‘पुढारी’चा ‘कस्तुरी क्लब’ हा उत्तम प्रयोग

‘पुढारी’ कार्यालयात भेटीदरम्यान सौ.दमयंतीराजे भोसले यांनी ‘पुढारी’ राबवत असलेल्या उपक्रमांची माहिती घेतली. महिलांसाठी ‘कस्तुरी’ क्लब हे व्यासपीठ असल्याचे समजल्यानंतर त्यांनी आवर्जुन या उपक्रमाची माहिती घेतली. कस्तुरी क्लबचे त्यांनी कौतुकही केले. कस्तुरीच्या माध्यमातून महिलांनाही पुढे येण्याची संधी आहे, असे त्या आवर्जुन म्हणाल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT