सातारा : महामार्गावरील टोल नाक्यांवर फास्टॅग नसल्यास ‘दुगना लगान’ वसुली सुरू केली आहे. हाच व्यवहार जर डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून केला गेला, तर टोलच्या 1.25 पट शुल्क भरावे लागणार आहे. वाहनधारकांना रोखीपेक्षा डिजिटल व्यवहार करणे फायदेशीर ठरणार असून, याची अंमलबजावणी शनिवारपासून (दि. 15) सुरू करण्यात आली आहे.
केंद्र शासनाने ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर राष्ट्रीय महामार्गांची कामे केली आहेत. अजूनही काही महामार्गांची कामे प्रस्तावित आहेत. सध्याच्या घडीला सहापदरी मार्गांची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. 80 टक्के कामे झाल्याने टोल वसुली आता वाढवून सुरू ठेवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच टोल दरांमध्ये 8 टक्क्यांच्या आसपास वाढ केली होती. त्यानंतर आता फास्टॅग न वापरणाऱ्यांकडून दुप्पट टोल आकारणी सुरू करण्यात आली आहे. आता सरकारने टोलच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. या नवीन नियमांनुसार फास्टॅगशिवाय टोलवर पोहोचणे पूर्वीपेक्षा महाग पडणार आहे. सरकारने राष्ट्रीय महामार्ग शुल्क (दर निर्धारण संकलन) नियम, 2008 मध्ये सुधारणा करून नवीन नियम लागू केला आहे. या नियमानुसार, जर एखादा वाहनचालक वैध फास्टॅगशिवाय टोल प्लाझावर वाहन घेऊन आला आणि टोलचे पैसे रोखीने त्याने देऊ केलेे, तर त्याला दुप्पट टोल शुल्क आकारले जाणार आहे.
मात्र, वाहनचालक डिजिटल पद्धतीने टोलचे पैसे भरत असेल तर त्यांना टोल शुल्काच्या फक्त दीड टक्के जादा पैसे भरावे लागतील. परिणामी, वाहनचालकांना आता रकमेपेक्षा डिजिटल पेमेंटद्वारे कमी पैसे द्यावे लागतील. समजा एखाद्या वाहनासाठी टोल 100 रुपये असेल आणि फास्टॅग काम करत नसेल आणि रोखीने टोलचे पैसे द्यायचे झाल्यास 200 रुपये द्यावे लागतील. जर फास्टॅग काम करत नसेल आणि डिजिटल यंत्रणा वापरून पैसे भरले केवळ 125 रुपये द्यावे लागतील. याचा अर्थ असा की, डिजिटल पेमेंटवर आता थेट सवलत मिळेल, तर रोख व्यवहारांवर जास्त शुल्क आकारले जाईल.
रांगा टाळण्याची उपाययोजना
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या निर्णयामुळे केवळ टोल प्लाझावरील लांबपर्यंत रांगा कमी होऊन वाहतूक कोंडी थांबेल. तसेच प्रवाशांना जलद आणि सुरळीत प्रवासाचा अनुभव मिळेल.