सातारा : सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात आरडीएक्स ठेवल्याचा ई मेल करुन लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी अज्ञाता विरुध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांचा तपास सुरु असून ठोस अशी माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, बॉम्ब ठेवल्याचा मेल आल्याच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात मेटल डिटेक्टर कार्यान्वित करण्यात आले आहे.
बुधवारी दुपारी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आरडीएक्स ठेवले असून त्याचा ब्लास्ट दुपारी 3.30 वाजता होणार असल्याचा ई मेल आला. हा ई मेल आल्यानंतर तो मेल तत्काळ पोलिसांना पाठवण्यात आला. यानंतर पोलिसांनी संपूर्ण सातारा जिल्हाधिकारी कार्यालय व परिसर मोकळा केला. याचवेळी पावसाला सुरुवात झाल्यानंतरही पोलिसांच्या बीडीएस व श्वान पथकाने सलग तीन तास जिल्हाधिकारी कार्यालयात सर्च ऑपरेशन राबवले. यावेळी परिसरात 100 हून अधिक पोलिस अधिकारी, कर्मचारी होते. मात्र आरडीएक्स तसेच बॉम्ब सदृश वस्तू कुठेही आढळून आली नाही.
या सर्व घटनाघडामोडीमुळे बुधवारी दिवसभर सातार्यातील वातावरण तणावपूर्ण होते. सायंकाळी उशीरा सातारा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार सागर निकम यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीमध्ये म्हटले आहे की, आकाश भास्करने या हॉट मेल वरुन स्वत:चे पूर्ण नाव व वास्तव्यस्थळ लपवून आरडीएक्स ठेवला असल्याची खोटी माहिती दिली. यामुळे लोकांमध्ये दहशतीचे, भितीचे वातावरण निर्माण झाले. अशा प्रकारे पोलिसांनी अज्ञाताविरुध्द तक्रार दिली. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाबतचा ई-मेल आल्यानंतर सातारा सायबर पोलिस ठाणे यांनी ई मेल कुठून आला? कोणी पाठवला? ई मेल करण्याबाबतचा उद्देश काय? हे तपासण्याचे काम सुरु झाले आहे.
दुसर्या दिवशी पोलिसांच्या हाती काही लागले नाही. मात्र लवकरच त्याबाबत माहिती समोर येईल, अशी खात्री पोलिसांनी व्यक्त केली आहे. बुधवारी सातारा जिल्हाधिकारी कार्यालय आरडीएक्स नाट्य संपल्यानंतर खबरदारी म्हणून कार्यालयात मेटल डिटेक्टर बसवण्यात आले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी घेण्यासाठी गुरुवारी सातारा शहर पोलिस व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी यांची बैठक झाली आहे.