सातारा : सातार्यातील सेव्हन स्टार इमारतीसमोर धारदार तलवार हातात घेऊन ती नाचवत दहशत निर्माण करताना प्रवीण विजय बल्लाळ (वय 28, रा. एनकूळ, ता. खटाव) याच्या वाहतूक विभागातील दोन पोलिसांनी मुसक्या आवळल्या. वाढदिवसाला भेट देण्यासाठी तो तलवार घेऊन निघाला असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. 28 जुलै रोजी ही कारवाई करण्यात आली आहे. वाहतूक विभागाचे पोलिस अमर काशीद व तानाजी भोंडवे हे एसटी स्टॅन्ड परिसरात कर्तव्य बजावत होते. रात्री 9 च्या सुमारास सेव्हन स्टार या इमारत परिसरात एकजण हातामध्ये धारदार तलवार घेऊन जात असल्याची माहिती या पोलिसांना मिळाली. दोन्ही पोलिसांनी तत्काळ परिसरात संशयिताचा शोध घेण्यास सुरुवात केली. संशयित एसटी स्टॅन्ड परिसरात दिसल्यानंतर त्याला पोलिसांनी शांत राहण्याचे आवाहन करुन ताब्यात घेतले.
पोलिसांनी संशयिताकडील तलवार ताब्यात घेऊन शहर पोलिसांना घटनेची माहिती दिली. गुन्हे प्रकटीकरण विभागातील पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेऊन त्याच्याकडील तलवार जप्त केली. त्याच्याकडे प्राथमिक माहिती घेतली असता नातेवाईकाला वाढदिवसानिमित्त तलवार भेट द्यायला पुण्याला निघालो असल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी त्याच्यावर आर्म अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला. दरम्यान, वाहतूक विभागाच्या पोलिसांनी गेल्या चार दिवसांत दमदार कारवाई करत घडू पाहणार्या गुन्ह्यांना आळा घातल्याने त्यांचे कौतुक होत आहे.